आयुष्यात आपण पहिल्यांदा एखादी भव्य दिव्य गोष्ट पाहतो तेव्हा आपली रिअॅक्शन कशी असते हे आपण सांगू शकत नाही. पण ही रिअॅक्शन पाहणाऱ्यांना मात्र त्याचे खूप कौतुक वाटते. लहानपणी आपण अशा कित्येक गोष्टी पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव व्यक्त झाले असतील. पण तेव्हा मोबाइल नसल्याने ते कॅमेरात कैद झाले असतीलच असे नाही. पण एका लहानग्याचे हेच भाव कॅमेरात कैद झालेले पाहायला मिळाले आणि नेटीझन्सही त्याचे हे भाव पाहून त्या बाळाच्या प्रेमात पडले. या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटीझन्सनी त्याचे खूप कौतुक केले. २०२० मध्ये हा व्हिडिओ काढण्यात आला असून तो एका लहानग्या मुलीचा आहे. आयुष्यात पहिल्यांदा धबधबा पाहिल्यानंतर तिने दिलेली प्रतिक्रिया कॅमेरात अतिशय परफेक्ट कैद झाली आहे.
न्यूयॉर्कमधील काटेर्स्कील धबधबा पाहून तिचे डोळे विस्फारले आहेत. आश्चर्याचे भाव त्या बाळाच्या चेहऱ्यावर अगदी सहज दिसत आहेत. या मुलीचे नाव सिमोन असून तिच्या पालकांनी हा व्हिडिओ सोशल युट्यूबवर अपलोड केला होता. त्यानंतर आता रेडइटवर हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हि़डिओला जवळपास ६४ हजार जणांनी पाहिले असून ८०० हून अधिकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला स्माइल करायला भाग पाडलेला व्हिडिओ, हा धबधबा तर मस्त आहेच, पण हे बाळही खूप क्यूट आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. आपल्या बाबांच्या मागे कांगारु बॅगमध्ये बसलेल्या या बाळानी उन्हासाठी छान टोपीही घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हात वर करुन, तोंडाचा आ वासून हसत ते इतक्या मोठ्या धबधब्याकडे अतिशय आश्चर्याने पाहताना पाहून आपल्यालाही खूप छान वाटते. आश्चर्याचे भाव या चिमुकलीच्या डोळ्यात अगदी सहज दिसत आहेत.