लग्न हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग. मग तो प्रमविवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह. यामध्ये केवळ नवरा-नवरी एक होत नाहीत, तर पूर्ण परिवार आयुष्यभरासाठी एकमेकांशी जोडले जातात. पण या प्रसंगी काही वेगळे घडले तर ते आयुष्यभरासाठी लक्षात राहते. सध्या सोशल मीडियामुळे जगभरातील लहानसहान गोष्टी अगदी सहज आपल्यापर्यंत पोहोचत असतात. लग्नाच्या वेळी वधूने काढलेल्या डुलक्या किंवा नवरदेवाने मैत्रीणीशी मारलेल्या गप्पा असे विविध व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना उत्तरप्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील लग्नाच्या वेळी घडलेली एक घटना कॅमेरात कैद झाली आणि सोशल मीडियावर ती वाऱ्याच्या वेगाने पसरली.
वरमाला घालताना नवरीने नवरदेवाला एकदा नाही तर चार वेळा कानाखाली दिली. इतकेच नाही तर त्यानंतर ती स्टेजवरुन खाली उतरुन निघून गेली. त्यानंतर वधू आणि वर अशा दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली. यामध्ये काही लोक जखमीही झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी येत दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवला. मात्र ऐन लग्नात असा प्रकार घडल्याने लग्नाचे आनंदाचे वातावरण एकदम गंभीर झाले.
उपस्थितांनाही अशाप्रकारे अचानक नवरीने नवऱ्यावर हात का उचलला हे समजले नाही. मात्र तिच्या काकांनी तिला भूताची बाधा झाली असावी असे सांगितले, लग्नाचा मेकअप करताना तिच्या गळ्यातील ताईत काढण्यात आल्याने तिने असे कृत्य केले असे त्यांचे म्हणणे आहे. यातील खरे-खोटे काय आपल्याला माहित नाही. मात्र पोलिसांच्या मध्यस्तीनंतर नवरीने माफी नवरदेवाची आणि त्याच्या कुटुंबियांची माफी मागितली त्यानंतर जोडप्याने रितसर विधी करुन लग्नगाठ बांधली. परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटीझन्स त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.