Viral Video : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. अजूनही इथे स्नान करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी आहे. जे लोक महाकुंभमध्ये जाऊ शकले नाहीत ते तिथून आणलेलं पवित्र पाणी अंगावर शिंपडून किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकून पवित्र स्नान करत आहेत. मात्र, एका महिलेनं याबाबतची सीमाच पार केली. या महिलेनं जे केलं ते बघून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.
व्हिडिओत दिसत असलेली महिला त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी गेली होती. मात्र, तिचा पती काही कारणानं तिच्यासोबत येऊ शकला नाही. अशात महिलेनं पतीला 'ऑनलाईन आंघोळ' घातली. जे बघून लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, महिला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पतीसोबत बोलत आहे. यादरम्यान ती बोलता बोलता फोन नदीच्या पाण्यात बुडवते आणि बाहेर काढते. फोन पाण्यात काही वेळा बुडवत असताना पती व्हिडीओ कॉलवर आहे.
महिलेचा हा कारनामा पाहून बघता बघता व्हिडीओ व्हायरल झालाय. तर लोक या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहे. एकानं लिहिलं की, "अरे भावांनो कुणी महाकुंभमध्ये गेलं असेल तर सांगा, मलाही असेच पाप धुवायचे आहेत". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "ही काहीतरी नवीन पद्धत आहे पाप धुण्याची". तिसऱ्यानं लिहिलं की, "खूप खूप शुभेच्छा तुमचे सगळे पाप धुतल्या गेले".
दरम्यान, काही दिवसांआधी महाकुंभमध्ये 'डिजिटल स्नान' करवून देणाऱ्या एका व्यक्तीची चर्चाही रंगली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक व्यक्ती 'डिजिटल स्नान' करवून देत असल्याचा दावा केला होता. व्यक्तीचा दावा होता की, ११०० रूपये घेऊन लोकांना डिजिटल स्नान करवून देत होता. ही व्यक्ती व्हॉट्सअॅपद्वारे लोकांनी काढलेल्या फोटोंची प्रिंट काढत होती आणि पाण्यात त्यांना बुडवून लोकांचे पाप धुवत होती.