परीक्षेचे पेपर आणि त्यामध्ये विद्यार्थी देत असलेली उत्तरे ही अनेकदा चेष्टेची बाब होत असल्याचे आपण पाहतो. काही वेळा विद्यार्थी एखाद्या प्रश्नाखाली निबंध लिहीतात तर कधी प्रेमाची कविता. काही वेळा उत्तर येत नसेल तर शिक्षकांना विनवणी करणारा एखादा मेसज लिहीतात तर काही वेळा चक्क पैसे पेपरला जोडल्याच्या घटनाही समोर येतात. विद्यार्थी काही वेळा अशी उत्तरे लिहीतात की शिक्षकांना ती पाहून राग येतो नाहीतर त्यांच्यावर काहीतरी कारवाई होते. नुकताच असाच एक पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्याने एका प्रश्नाचे अतिशय हास्यास्पद उत्तर दिले आहे. हे उत्तर आणि शिक्षिकेने त्यावर दिलेला शेरा पाहून आपली हासून पुरेवाट लागू शकते (Viral Answer sheet of Student Remarked by Teacher).
बरेचदा विद्यार्थी प्रश्नपत्रिका पाहताना आपल्याला कोणत्या प्रश्नांची उत्तरे येतात ते प्रश्न पाहतात. काही विद्यार्थी वर्षभर अजिबात अभ्यास करता ऐन परीक्षेच्या तोंडावर अभ्यास करणारे असतात. तर काही जण वर्षभर व्यवस्थित अभ्यास करुन परीक्षेत चांगले यश मिळवणारे असतात. जर परीक्षेच्या वर्गात सुपरवीजनला असलेले शिक्षक कडक असतील तर ते अजिबात कॉपी करु देत नाहीत आणि मग अभ्यास न झालेल्यांची किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर न येणाऱ्या विद्यार्थ्याची अडचण होते. अशावेळी आपल्या उत्तरपत्रिकेत आपल्याला येत असेल ते लिहीण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. मग विद्यार्थी अशावेळी काहीही लिहीतात, त्याचेच उदाहरण यावेळी पाहायला मिळाले.
तर शिक्षिकांनी प्रश्नपत्रिकेत अगदी सोपा प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये कोल्ड आणि चिल्डच्या तापमानात काय फरक असतो असं विचारण्यात आलं होतं. विद्यार्थ्याने यावर उत्तर देताना आपल्याला जे वाटले ते बिंधास्तपणे लिहीले. ते म्हणजे, ‘कोल्ड आणि चिल्ड’मध्ये कोणतेच अंतर नसते. यामध्ये केवळ भावनांचे अंतर असते. बिअर चिल्ड असते आणि कॉफी कोल्ड असते’ असं या विद्यार्थ्याने चक्क आपल्या उत्तरात उदाहरणादाखल लिहीलं आहे. हे उत्तर वाचून राग आलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला असा काही शेरा दिला की तो पाहून आपण चकीत होऊ. आधी शिक्षिकेने या विद्यार्थ्याला १० पैकी वजा ५ मार्क दिले. ‘तुझे टर्मिनेशन सर्टीफिकेट तयार केले आहे, उद्या वडिलांना शाळेत येऊन ते घेऊन जायला सांग’. आता हा प्रश्न नेमका कुठे विचारण्यात आला की हा पेपर प्रँक आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.