नवरा-बायको हे असे नाते आहे की दोघेही एकमेकांशी भांडतात तितकेच एकमेकांवर प्रेमही करतात. कायम एकमेकांना साथ देणारे हे नवरा-बायको एकमेकांची तितकीच काळजीही करताना दिसतात. कधी एखाद्याला बरे नसले तर डॉक्टरकडे नेण्यापासून ते खायला भरवण्यापर्यंत अनेक गोष्टी हे दोघे करत असतात. नवरा-बायकोच्या याच नात्याविषयी बऱ्याच गोष्टी आपण अनेकदा पाहतो आणि ऐकतोही. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये एक नवरा आपल्या बायकोची अतिशय प्रेमाने काळजी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण इमोशनल होत असून तो नेटीझन्सकडून वारंवार पाहिला जात आहे (Viral Emotional Video of Couple Sitting Roadside).
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये बस स्टँडवर बसला आहे. त्याच्या मांडीत त्याची पत्नी झोपली असून आपल्या पत्नीला तो अतिशय प्रेमाने थोपटत आहे. चेहऱ्यावर प्रकाश येऊ नये म्हणून या महिलेने पांघरुण आपल्या चेहऱ्यावर ओढून घेतले असल्याने तिचा चेहरा आपल्याला दिसत नाही. या महिलेचा हात तिच्या चेहऱ्याखाली अवघडेल की काय म्हणून हा नवरा हा हात तिच्या डोक्याखालून काढतो आणि बाजूला ठेवतो. बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्यामुळे कदाचित या नवऱ्याचा पाय अवघडून आलेले असू शकतात मात्र तिची झोप मोडू नये यासाठी तो आहे त्याच पोझमध्ये बराचवेळ बसून राहतो. कठिण परिस्थितीतही एकमेकांवर असलेले प्रेमाला ते जागत असल्याचेच यातून दिसते.
हमसफर वही जो हर सफर में आपके साथ हो pic.twitter.com/QbyVbZi4AE
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 19, 2022
ट्विटरवर जिंदगी गुलजार है या पेजवर हा ३१ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा नेमका कोणत्या शहरातील आहे याबाबत माहिती नसली तरी नेटीझन्स अतिशय इमोशनल होऊन हा व्हिडिओ पाहत आहेत. या व्हिडिओला कॅप्शनही अतिशय सुंदर देण्यात आली आहे. ‘हमसफर वही जो हर सफर में आपके साथ हो’ असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. काही तासांत ५० हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईक आणि रिट्विटही केला आहे. इतकेच नाही तर बऱ्याच जणांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.