लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू गोळा करण्याची आवड असते. काही जण नाणी गोळा करतात, काहींना शंख-शिंपले गोळा करण्याचीही आवड असते.पण आजकालची मुलं पोकेमॉन, बेन १० कार्ड आणि टॅझो गोळा करतात. याच दरम्यान एक अजब घटना समोर आली आहे. विचित्र छंद असलेल्या एका मुलीची जोरदार चर्चा रंगली आहे. ही मुलगी डासांना मारते आणि नंतर ते जपून ठेवते. त्यानंतर ती डासाला नावंही देते, त्यासंबंधीचे तपशील रेकॉर्ड करून ठेवते.
इन्स्टाग्राम युजर आकांक्षा रावतने अलीकडेच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक मुलगी दिसत आहे. मुलीने तिच्या अशा एका छंदाबद्दल सांगितलं की जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आकांक्षाला ती मुलगी कोण आहे हे माहित नाही, पण आकांक्षालाही मुलीने भलताच छंद जोपासला असल्याचं वाटतंय. मुलीने सांगितलं की तिला डास मारणं आणि त्यांची नोंद ठेवायला आवडतं.
मुलगी सर्वात आधी डासांना मारते, नंतर त्यांना नावं देते आणि कागदावर चिकटपट्टीने चिकटवते. डास मारलं ते ठिकाण, त्याच्या मृत्यूची वेळ आणि दिवस नोंदवते. अशाप्रकारे तिने एका कागदावर अनेक डासांची माहिती लिहून ठेवली आहे. त्या यादीत सुरेश, रमेश, प्रिया अशी नावं डासांना दिली आहेत. मुलीने एकाला सिग्मा बॉय नाव दिले होते. जेव्हा आकांक्षा आणि तिच्यासोबत बसलेल्या एका मुलीने हे पाहिले तेव्हा त्यांनी मुलीला गमतीने सायको म्हटलं आहे.
या व्हिडिओला तब्बल ८४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा एक अतिशय अनोखा छंद आहे. संपूर्ण डास समुदायात भीतीचे वातावरण आहे असं एका युजरने म्हटलं आहे. आता या पिढीत डासही सुरक्षित नाहीत असंही काही लोकांनी म्हटलं आहे. मुलीच्या या भलत्याच छंदाची जोरदार चर्चा रंगली आहे.