Join us  

ना खलबत्ता, ना मिक्सर- २ मिनिटांत पदार्थ होतील बारीक, पाहा हॅण्ड ब्लेंडरची सोपी व्हायरल ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 9:18 AM

Viral hand blender hack cooking tips : कमीत कमी पदार्थ बारीक करायचा असेल तर ही ट्रिक नक्कीच उपयुक्त आहे.

आपल्याला एखादा पदार्थ करताना अगदी झटपट कसलीतरी पूड किंवा पेस्ट हवी असते. मग मिक्सरचे भांडे शोधा, ते धुवा आणि मग त्यात पेस्ट किंवा पूड करा असे केले जाते. पण हे जिन्नस अगदी कमी असतील तर ते मिक्सरमध्येही नीट बारीक होत नाहीत आणि मग ही पूड जाड जाड राहते. मिक्सरचे भांडे, त्याचे ब्लेड मोठे असेल आणि आपण बारीक करण्यासाठी घातलेले जिन्नस कमी असतील तर साधारणपणे असे होण्याची शक्यता जास्त असते. पण त्यापेक्षा झटपट अगदी २ ते ३ मिनीटांत आपल्याला एखादी पेस्ट किंवा पूड करुन हवी असेल तर त्यासाठी एक खास ट्रिक आज आपण पाहणार आहोत. 

काय आहे ही ट्रिक

आपण घरात मिक्सर, ओव्हन, इलेक्ट्रीक कुकर, यांप्रमाणेच ब्लेंडरचाही वापर करतो. हँड ब्लेंडर ही स्वयंपाकघरातील अतिशय सोयीची आणि महत्त्वाची गोष्ट असते. दह्याचे लोणी करण्यासाठी, अंडी फेटण्यासाठी किंवा पावभाजीची भाजी बारीक करण्यासाठीही अनेक जण या इलेक्ट्रीक ब्लेंडरचा वापर करतात. हाच ब्लेंडर उलटा करुन त्यामध्ये मिरची, लसूण, जीरे, काळी मिरी असे आपल्याला जे बारीक करायचे आहे ते लावायचे. त्यावर एखादे प्लास्टीक किंवा प्लास्टीकची पातळ पिशवी घट्ट धरुन ठेवायची. मग हा ब्लेंडर सुरू करायचा. याला असलेल्या पात्यांमुळे आतमधील पदार्थ छान मिक्सरप्रमाणे बारीक होतो. कमी पदार्थ बारीक करायचा असेल तर ही ट्रिक नक्कीच उपयुक्त आहे.  

सध्या सोशल मीडियावर ही ट्रिक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया हे हल्ली अतिशय प्रभावी माध्यम झालेले असून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी आणि आपले काम झटपट होण्यासाठीचे अनेक उपाय आपल्याला अगदी सहज याठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे आपले काम सोपे आणि कमी वेळात होण्यास मदत होते. या ट्रिकचा व्हिडिओही सोशल मिडियावर अनेकांनी पोस्ट केला असून त्यामध्ये मिरचीची पेस्ट, आलं, लसणाची पेस्ट, धणे-जीरे पूड, मीरपूड असे बारीक करुन दाखवले आहे. ब्लेंडरच्या मदतीने हे काम अगदीच झटपट होत असल्याने ही ट्रिक तुम्हीही नक्की वापरुन पाहा. 

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स