सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतं आणि नेटीझन्स या व्हायरल झालेल्या गोष्टींचा आनंद घेत असतात. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे नोकरी सोडण्याचे म्हणजेच रेजिग्नेशन लेटर सोशल मीडियात व्हायरल झालेले पाहायला मिळाले. यामध्ये अगदी एका ओळीत बाय बाय सर म्हणत नोकरीतून रजा घेत असल्याचे लेटरही होते तर आता आपल्याला कामाचा फार कंटाळा आला आहे असे प्रामाणिकपणे सांगत नोकरी सोडणारेही होते. अशाचप्रकारे नुकताच एक सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे बीएसए ऑफीसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा अर्ज आपल्या अधिकाऱ्यांना लिहीला आहे. आता या अर्जात असे काय आहे की तो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हावा? तर आपली पत्नी चिडून माहेरी निघून गेली आहे आणि तिला आणायला जाण्यासाठी आपल्याला ३ दिवसांची सुट्टी हवी आहे असे या अर्जात म्हटले आहे (Viral Leave Application of Employee Social Media).
हा अर्ज लिहीलेल्या कर्मचाऱ्याचे नाव शमशाद अहमद असून आपल्याला वर्षभरात एकही सुट्टी न मिळाल्याने पत्नी खूप चिडली. रागाच्या भरात ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली आहे. आता आपल्याला तिला आणायला तरी जावेच लागेल. त्यामुळे सुट्टी देण्यात यावी असे अहमद यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. त्यांचा हा सुट्टीचा अर्ज त्यांच्या ऑफीसमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. ते हिंदीमध्ये लिहीतात, पत्नीसोबत भांडण झाले आहे ही गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे. चिडलेली पत्नी मुलगी आणि दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली आहे. यामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून आता तिला आणण्यासाठी आपल्याला सासुरवाडीला जावे लागणार आहे. त्यामुळे मला ३ दिवसांची ऐनवेळची सुट्टी देण्यात यावी ही विनंती.
आपल्यालाही कधी आजारी पडतो म्हणून तर कधी कौटुंबिक अडचणींसाठी नोकरी करत असताना सुट्टी घ्यावी लागते. त्यावेळी आपण आपल्या अधिकाऱ्यांना सुट्टीचे कारण सांगत ऑफीशियल मेल करतो. आपला बॉस चांगला असला तर आपल्याला ही सुट्टी मिळते नाहीतर कामाचा ताण असल्याने बरेचदा मागूनही सुट्टी मिळत नाही. अशावेळी आपणही काहीसे वैतागतो. अहमद यांनी या आधीही काही वेळा सुट्टीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जाची योग्य ती दखल त्यांच्या अधिकाऱ्यांकडून घेतली गेली नाही. त्यामुळे शेवटी अहमद यांनी वैतागून सुट्टी हवी असण्याचे खरे कारण सांगून टाकायचे ठरवले आणि अशाप्रकारचा अर्ज लिहीला. विशेष म्हणजे त्यांचा हा अर्ज सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आता त्यांना खरंच सुट्टी मिळाली का नाही आणि ते आपल्या सासुरवाडीला पत्नीला आणण्यासाठी गेले की नाही हे मात्र समजू शकले नाही.