Join us  

गाझामध्ये अडकून पडलेल्या १२ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन मुलाचं व्हायरल पत्र, तो विचारतो मी जिवंत राहीन ना..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 5:57 PM

एक ऑस्ट्रेलियन मुलगा सुटीत आजीआजोबांच्या घरी येतो आणि युद्धात अडकतो..

ठळक मुद्देहे पत्र व्हायरल आहे सध्या.. पण याझानच्या प्रश्नांची उत्तरं तुर्त कुणाकडेच नाहीत.

माधुरी पेठकर

गाझा आणि इस्त्रायल. ८ ऑक्टोबरपासून इस्त्राएल आणि गाझामध्ये युध्द सुरु झालंय. सुरक्षित राहाण्यासाठी लाखो माणसांची धडपड सुरु आहे. त्यातला एका मुलगा म्हणजे याझान हेलीस. त्याने समाजमाध्यमांवर एक पत्र लिहिलं.  याझान हेलीस हा १२ वर्षांचा असून तो मूळ ऑस्ट्रेलियातला. ॲडलेड येथे राहतो तो. पण काही दिवसांपूर्वी तो, त्याचे आई बाबा आणि ७ वर्षांची बहीण हे सर्व गाझाला आलेत. याझानचे वडील पॅलेस्टिनी तर आई ऑस्ट्रेलियन.  गाझाला आला तो आजी आजोबांच्या घरी. तिथे मजा करायला, सुट्या घालवायला. पण झालं वेगळंच.  

याझान लिहितो की..तू ठीक आहेस ना? असा प्रश्न मला कोणी विचारु नका. कारण मी ठीक नाहीये. मी सुरक्षितही नाहीये. मला ऑस्ट्रेलियात जायचंय. तिथे खूप शांतता आहे. आम्ही खूप वर्षांपासून गाझाला येण्याची वाट पाहात होतो. आम्हाला आजी आजोबांना भेटायचं होतं. माझे बाबा तर त्यांना गेल्या १२ वर्षांपासून भेटलेच नव्हते. आम्हाला यावर्षी गाझाला येता आले. आम्ही चांगली ४ आठवड्यांची सुटी घालवण्यासाठी आलो होतो. आल्या दिवसापासून आमची मजा सुरु होती. आम्ही समुद्रावर गेलो. माझी चुलत भावंडंही आजोबांच्या घरी आली. आम्ही रात्र जागून गप्पा मारल्या. मध्यरात्री स्वयंपाकघरात जावून आम्ही चोरुन आमच्या आवडीचा खाऊ तयार केला. तो खाऊन आम्ही पुन्हा गप्पा मारल्या.काही दिवसांनी आम्ही बाहेर फिरायला गेलो. एका रेस्टाॅरण्टमध्ये आम्ही बर्गर आणि आइस्क्रिम खाल्लं. खूप मजा आली. पण रेस्टाॅरण्टमधील पदार्थांपेक्षा माझी आजी जे बनवते ते पदार्थ खूप भारी असतात. आजीने आमच्यासाठी पिझ्झा, स्पगेटी, फटा, मकलुबासारखे पॅलेस्टिनी पदार्थ बनवले. आजी आजोबांकडे चोको-मिको नावाची दोन मांजरंही आहेत. त्यांच्यासोबत माझा वेळ कसा जायचा तेच कळायचं नाही. अशी सर्व मजा सुरु होती. आम्ही शुक्रवारी रात्री दुसऱ्या दिवशी काय मजा करायची ते ठरवून झोपले. पण सकाळी आम्हाला जाग आली ती बाॅम्बच्या आवाजांनी. सगळं वातावरण एकदम बदललं. बाबा म्हणाले, 'काहीतरी भयंकर सुरु आहे बाहेर!' रोज येथील बाॅम्बचे आवाज वाढतच गेले. हे बाॅम्ब आजोबांच्या घराशेजारी पडू लागले. आजी आजोबांच्या शेजाऱ्यांच्या घरावर बाॅम्ब पडला. मांजरांनाही तो आवाज सहन होत नव्हता. मांजरं उलट्या करु लागली. आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. डाॅक्टरांनी मांजरांना औषधं दिली. आम्ही जिथे राहात होतो तिथे नंतर जास्तच बाॅम्ब पडू लागले. आम्ही जिवंत राहू की मरुन जावू असे प्रश्न पडू लागले. बाॅम्ब हल्ल्यांमध्ये आमच्या शेजारची इमारत पडली. म्हणून मग आम्ही सर्वांनी गाझामधील एका मोठ्या हाॅस्पिटलात आसरा घेतला. त्या हाॅस्पिटलमध्ये लोकांची खूप गर्दी झाली होती. त्यामुळे आम्हाला रात्री जमिनीवर तसंच झोपावं लागलं. आमच्याकडे पांघरुण, सतरंजी काहीच नव्हतं. नंतर काकांच्या लक्षात आलं की चोको मांजर मेलं. मिको जिवंत राहिला. पण घाईगर्दीत त्याला आमच्यासोबत घ्यायचंच विसरलो. मिको गर्दीत हरवलं. मला फार वाईट वाटत आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही राफा बाॅर्डरवर गेलो. अख्खा दिवस आम्ही उन्हात घालवला. पण सीमा बंदच. मग आम्ही तिथून जवळ असलेल्या आमच्या काकांच्या मित्राच्या घरी गेलो. तिथे गेलो तोपर्यंत आम्ही जिथे आसरा घेतला होता त्या हाॅस्पिटलवर बाॅम्ब हल्ला झाला. 

(Image Google)

मला म्हणून आता ऑस्ट्रेलियात जायचं आहे.  उद्या काय होईल काहीच माहीत नाही. मी अनाथ होईल का? माझे आई बाबा सुरक्षित राहतील ना? आम्ही ऑस्ट्रेलियाला जावू शकू ना? माझ्या मनात खूप प्रश्न पडत आहेत. आम्ही का नाही जावू शकत परत? मला फुटबाॅलची, माझ्या मित्रांची, त्यांच्या सोबत सायकल चालवण्याची खूप आठवण येते आहे. हे सर्व माझ्यासाठी महत्वाचं आहे. मला शाळेत जायचंय. मला गणितं सोडवायला खूप आवडतात. मला माझ्या घरी जायचंय. माझ्या खोलीत माझ्या बेडमध्ये शिरुन मला झोपायचंय. ती फार सुरक्षित जागा आहे.’हे पत्र व्हायरल आहे सध्या.. पण याझानच्या प्रश्नांची उत्तरं तुर्त कुणाकडेच नाहीत. 

टॅग्स :गाझा अटॅकइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षइस्रायलसोशल व्हायरल