टाइम टेबल बनवणे ही अतिशय चांगली सवय आहे. त्यामुळे त्या त्या वेळेला ठराविक काम करण्याची सवय असते. शाळेचे एक टाइम टेबल सोडले तर आपण फारसे टाइम टेबल बनवण्याच्या फंदात पडत नाही. कारण आपण कितीही टाइम टेबल बनवलं तरी ते म्हणावं तसं फॉलो होत नाही आणि मग आपल्याला ते बनवण्याचाच कंटाळा यायला लागतो. काहीवेळा पालक किंवा लहान मुलं स्वत: मात्र त्यांच्या दिवसाचे, अभ्यासाच्या वेळांचे टाइम टेबल बनवतात आणि एखाद्या बोर्डला ते लावून ठेवतात. त्यामुळे मुलांनाही अमुक वेळेत अमुक गोष्ट करण्याची चांगली सवय लागते. नुकतेच एका लहान मुलाने असेच एक टाइम टेबल बनवले आणि काही वेळातच हे टाइम टेबल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले (Viral Photo of 6 Years old boy Time Table).
आता साधाशा टाइम टेबलवर इतकी चर्चा होण्याचे कारण काय? तर हे अभ्यासाचे टाइम टेबल असून यामध्ये अभ्यासाला केवळ १५ मिनीटे देण्यात आली आहेत. बाकी खेळणे आणि इतर गोष्टींना बराच वेळ देण्यात आला असल्याने हे अभ्यासाचे टाइम टेबल आहे, खेळाचे आहे की मारामारीचे असा प्रश्न पाहणाऱ्यांना पडतो. त्यामुळे हा मुलगा किती वस्ताद असावा असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. लहान मुलांना अनेकदा अभ्यास सोडून बाकी गोष्टींमध्येच जास्त रस असतो. हे टाइम टेबल हे त्याचेच एक उदाहरण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण पठ्ठाने दुपारी २.३० ते २.४५ असा मोजून १५ मिनीटांचा वेळ अभ्यासासाठी ठेवला आहे. इतकेच नाही तर फायटींग टाईम हा थोडा थोडका नाही तर ११.३० ते २.३० असा तब्बल ३ तासांचा ठेवला आहे. बाकीचा वेळ झोपणे, गाडी खेळणे, खाणे, आंघोळ करणे अशा गोष्टींसाठी ठेवला आहे. रात्री ९ ला झोपून सकाळी ९ ला उठायचे असेही या टाइम टेबलमध्ये दिसत आहे.
My 6 year old cousin made this timetable...Bas 15 minutes ka study time, zindgi tu Mohid jee ra hai 😭🤌 pic.twitter.com/LfyJBXHYPI
— Laiba (@Laiiiibaaaa) June 22, 2023
लाईबा या एका ट्विटर अकाऊंटवरुन हा टाइम टेबलचा फोटो अपलोड करण्यात आला असून आपल्या भावाचे हे रुटीन आहे असे या मुलीने पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर हा मुलगा किती लकी आहे, १२ तास झोपू शकतो, फायटींग टाइम म्हणजे नक्की काय अशा प्रतिक्रिया यावर देण्यात आल्या आहेत. या लहानग्या मुलाचे वय अवघे ६ वर्षे असून त्याचे नाव मोहिद आहे. तो खरं लाईफ जगतो असंही या पोस्ट करणाऱ्या मुलीने म्हटले आहे. या पोस्टला अवघ्या ४ दिवसांत १३ लाख व्ह्यू मिळाले असून हजारोंनी हे ट्विट रिट्वीट केले आहे.