आपण सगळेच हल्ली स्वत: एखादी गोष्ट जाऊन आणण्यापेक्षा ऑनलाइन खरेदी करण्याला प्राधान्य देतो. पावसापाण्याच्या दिवसांत तर स्वत: जाऊन काही आणण्यापेक्षा थोडे जास्त पैसे गेले तरी आपल्याला हवी ती गोष्ट घरपोच आली तर ते सगळ्यात सोयीचे असते. काही वर्षांपूर्वी कपडे, घरातील इतर सामान असे आपण ऑनलाइन मागवत होतो. पण कोरोना काळापासून भारतातही विविध कंपन्या किराणा सामान, दूध, भाजीपाला, फळे, तयार पदार्थ, केक अशा आपल्याला हव्या त्या कोणत्याही गोष्टी सहज घरपोच पोहचवतात. यामुळे वयस्कर लोक आणि कामामुळे किंवा तब्येतीमुळे फारसे बाहेर न पडू शकणाऱ्यांसाठी ऑनलाइन ऑर्डर करुन काही मागवणे सोपे असते. एका महिलेने ऑनलाइन केक ऑर्डर केला आणि डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने काय केले पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
वैष्णवी मोंडकर नावाच्या महिलेने झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी देणाऱ्या कंपनीकडून केक ऑर्डर केला. डिलिव्हरी इन्स्ट्रक्शनमध्ये या महिलेने ‘५०० रुपये सुटे घेऊन या’ अशी सूचना लिहीली. कदाचित तिच्याकडे सुटे पैसे नसावेत म्हणून तिने अशाप्रकारची सूचना लिहीली असावी. आता वाटायला हे अगदी सामान्य वाटेल. पण खरा घोळ झाला तो पुढे. आर्डर केलेल्या केकवरच कंपनीने Bring 500 Change असा मेसेज लिहीला. आपण साधारणपणे केकवर ज्या व्यक्तीचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस आहे त्याचे नाव किंवा त्याच्यासाठी एखादा मेसेज केकवर लिहीतो. पण या कंपनीने महिलेने दिलेली सूचनाच थेट केकवर लिहून पाठवली.
वैष्णवी यांना हा केक पाहून सुरुवातीला काहीसे आश्चर्य वाटले पण नंतर त्यांना आपण जी सूचना लिहीली ती कंपनीने अशाप्रकारे लिहून पाठवली. वैष्णवी यांनी या केकचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर काही वेळात वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी या पोस्टला वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. मात्र वैष्णवी यांनी हा केक नेमका कोणत्या कारणाने मागवला होता आणि त्यावर असा मेसेज लिहील्यावर त्यांनी पुढे काय केले याबाबत मात्र कळू शकलेले नाही. पण फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने घातलेल्या गोंधळाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.