हॉटेलमध्ये गेलो की आपण आपल्या आवडीचे पदार्थ आवर्जून खातो. मग आपण ते किती रुपयांना आहेत हे पाहत नाही. आपलं खाऊन झालं की बील आल्यावरच अनेकदा आपण किती रुपये खाण्यावर खर्च केले हे आपल्याला कळतं. त्यानंतर आता लवकर आपण बाहेरचं खायचं नाही असंही आपण ठरवतो. हॉटेलचं बील देताना आपण सगळे जण एक गोष्ट आवर्जून करतो ती म्हणजे आपल्याला सर्व्ह करणाऱ्या वेटरला टिप देणे. अनेकांना ही टिप देणे आवश्यक असल्याचे वाटते तर काही जण टिप म्हणजे लाच असल्याचे म्हणत ती देणे टाळतात. आता हे सगळे ठिक आहे, पण टिप म्हणजे किती १० रुपये, २० रुपये फारतर ५० किंवा १०० रुपये हे आपल्याला माहित आहे. पण एका व्यक्तीने हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर तब्बल १२ लाख रुपयांची टिप वेटरला दिली (Viral Photo of Hotel Bill Customer Give 12 lakhs As a Tip In Restaurant).
विशेष म्हणजे या व्यक्तीने हॉटेलमध्ये जे काही खाल्ले त्याचे बील अवघा २८०० रुपये झाले होते. मग त्याने इतकी टीप का दिली असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. तर ही घटना लंडनमध्ये घडली असून स्टंबल इन बार अँड ग्रील या रेस्टॉरंटने आपल्या फेसबुक अकाऊंटवर या बीलाची कॉपी शेअर केली आहे. त्यानंतर हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि या बीलाची सगळीकडेच चर्चा रंगली. या हॉटेलचे मालक मायकेल जरेला यांनी इतकी टिप देणाऱ्या ग्राहकाचे नाव न सांगता आभार मानले. आपल्या रेस्तरॉमध्ये एक अतिशय उदार व्यक्ती आला होता, त्याने १६ हजार डॉलर इतकी टिप दिली, ही किंमत रुपयांमध्ये ११ लाखांहून अधिक आहे.
या व्यक्तीने पैसे दिल्यानंतर सगळे एकाच ठिकाणी खर्च करु नको असे बार टेंडरला सांगितले. त्यावेळी उत्सुकतेने बारटेंडरने बील पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आले की ही रक्कम खूप जास्त आहे. त्यावेळी तुम्ही माझी मजा करताय का असा प्रश्न तिने या ग्राहकाला विचारला. तेव्हा आपण चेष्टा करत नसून आपल्याला ही टिप देण्याची इच्छा असल्याचे या ग्राहकाने सांगितले. त्यानंतर ही व्यक्ती बरेचदा आपल्या रेस्टरॉमध्ये आल्याचे मालक जरेला यांनी सांगितले. एकदा आपण त्यांना इतकी टिप देण्याबाबत विचारणाही केली. मात्र आपली टिप देण्याची इच्छा असल्याने आपण दिल्याचे त्यांनी सांगितले. ही टिप ८ बारटेंडरमध्ये समान वाटप करण्यात आली. इतकेच नाही तर किचन सर्व्हरमध्येही यातील एक हिस्सा वाटण्यात आला.