Join us  

गावाकडची व्हायरल चूल पाहून नेटकरी झाले सेण्टी; प्रश्न एकच चूल फुंकायची कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 3:33 PM

Mitti Ka Chulha: सध्या सोशल मिडियावर अस्सल गावाकडच्या सारवलेल्या चुलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून जुनं ते साेनं (old is gold) असं लोक म्हणत आहेत.... पण खरंच चुलीच्या बाबतीत असं आहे का, तुम्हाला काय वाटतं?

ठळक मुद्देखरंच प्रत्येक जुनी गोष्ट ही सोन्यासारखी असते का?

सोशल मिडिया म्हणजे जणू काही एक भला मोठा समुद्र आहे. जगभरातून त्यात काय काय टाकलं जातं आणि वाहत वाहत ते जगभरातल्या करोडो लोकांपर्यंत पोहोचतं. असंच सध्या झालं आहे एका चुलीचं.. होय गावाकडे जशी सारवलेली चूल असते, अगदी तशीच चूल एका पोस्टमध्ये दिसते आहे. @MahakaviDinkar या ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून त्याला ''जिस गाँव में हमने जन्म लिया है उसके आगे लन्दन और मास्को फीके हो जाते हैं!❤️ #दिनकर'' अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

 

फोटो अतिशय सुरेख असून गावाकडचा फिल देणारा आहे, हे १०० टक्के खरं.. काही जणांनी या कॅप्शनला पुर्णपणे सहमती दाखवली असून जुनं ते सोनं असं म्हणत कमेंटही केली आहे. पण खरंच प्रत्येक जुनी गोष्ट ही सोन्यासारखी असते का? अशी छानशी सारवलेली चुल पाहिली की एक दिवसापुरतं आपल्याला तिचं आकर्षण वाटतं. चुलीवरचा स्वयंपाक अतिशय चवदार लागतो, यातही काही वाद नाही. पण चाखायला चवदार लागत असला तरी त्याच्यावर स्वयंपाक करणं हे खरोखरंच महिलांच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक काम.

 

चुलीवर एक दिवस तर सोडाच पण एक वेळचा जरी स्वयंपाक करायचा म्हटलं तरी ते खूप कठीण आहे. त्यामुळेच तर गावाकडच्या आपल्या आज्या, पणज्यांच्या मागे चुलीने अनेक दुखणी लावली होती. चुलीत आग पेटती रहावी म्हणून सारखं तिला फुंकावं लागतं. त्याचे निखारे उडतात, चटके लागतात, डोळ्यात जाऊन अनेकींना कायमचं आंधळंही व्हावं लागलं आहे.. शिवाय चुलीच्या धुरामध्ये वर्षानुवर्षे काम केल्याने अनेकांना दमा, फुफ्फुसाचे आजारही मागे लागले आहेत. म्हणूनच तर ही गावाकडची चूल कितीही देखणी असली तरी दुरून डोंगर साजरे... असं ते प्रकरण आहे. त्यामुळेच तर घरातल्या महिलांना निरोगी ठेवायचं असेल तर आता गावात किंवा शहरात चूल असावी, पण फक्त डेकोरेशन पुरतीच... असं अनेकांचं मत आहे..

 

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटरग्रामीण विकासमहिलाआरोग्य