Join us  

Viral Photo : बापरे! काय ही अन्नाची नासाडी...IAS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या फोटोवरुन समोर आले सत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 3:03 PM

लग्नसमारंभ म्हटले की जेवणावळी आणि त्यामध्ये होणारी अन्नाची नासाडी हे हल्ली सर्रास दिसणारे चित्र. पण याबाबत प्रत्येकाने विचार करायला हवा...अधिकाऱ्याने पोस्ट केलेल्या फोटोनंतर विषयावर पुन्हा चर्चा...

ठळक मुद्देहा फोटो पाहून आपलाही जीव हळहळला नाही तरच नवल. अन्न वाया घालू नये हे आपण सगळेच शिकलेलो असतो, पण प्रत्यक्षात वेळ आल्यावर मात्र आपण हे विसरतो

भारतात लग्न किंवा एखादा मोठा समारंभ म्हणजे जेवणावळी. गावाकडे आजही लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचेल, जेवणासाठी लागलेल्या रांगा हे चित्र पाहायला मिळते. लग्न म्हटल्यावर जेवणावर तर ताव मारायलाच हवा, हे जरी खरे असले तरी आपल्या भूकेप्रमाणेच ताटात वाढून घ्यायला हवे आणि ताटात घेतलेले सगळे खायला हवे. पण हे सगळे सांगायला आणि ऐकायला ठिक आहे. प्रत्यक्षात मात्र आपल्याकडे आजही लग्नसमारंभात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना दिसते. एकीकडे असंख्य लोकांचा भूकेमुळे मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत असताना दुसरीकडे मात्र अन्नाची अशाप्रकारे नासाडी होणे ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे.

नुकताच एका IAS अधिकाऱ्याने याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यावरुन पुन्हा एकदा वाया जाणाऱ्या अन्नाबाबत चर्चा रंगताना दिसत आहेत. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘तुम्ही तुमच्या लग्नाच्या फोटोग्राफरकडून मिस केलेला फोटो. अन्न वाया घालवणे बंद करा.” यामध्ये एका व्यक्तीच्या आजुबाजूला जेवलेल्या ताटांचा ढीग असून तो ही ताटे साफ करताना दिसत आहे. ताटे साफ करताना त्यात राहिलेले अन्न काढल्यानंतर त्या अन्नाचा एक ढिग त्याच्यासमोर तयार झालेला आहे. हे पाहून आपलाही जीव हळहळला नाही तरच नवल. 

त्यामुळे लग्नाकार्यात अन्न वाढणाऱ्या वाढप्यांना वाढप्यांनाही योग्य ते प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अनेकदा हे वाढपी समोरच्याला किती हवे आहे याचा विचार न करता एकदम वाढतात आणि एकदा ताटात आले म्हटल्यावर आपल्या पोटात जागा नसेल तर ते अन्न फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच लग्नाकार्यात जाणाऱ्या प्रत्येकाने अशाप्रकारे अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. व्टिवटरवर शेअर करण्यात आलेला हा फोटो पाहून नेटीझन्स संतापल्याचे या पोस्टवरील प्रतिक्रियांमधून दिसत आहे. अन्नाची अशी नासाडी टाळता येईल यासाठी लग्नसमारंभाच्या ठिकाणी काही नियम करायला हवेत, तसेच अशाप्रकारे अन्न उरले तर ते वाया न घालवता गरजूंना वाटायला हवे असे यूजर्सचे म्हणणे आहे. आता हा फोटो नेमका कोणत्या शहरातील आणि कोणाच्या लग्नातील आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न