Join us  

स्वत:शीच लग्न करणाऱ्या क्षमा बिंदूने साजरी केली करवा चौथ, कशी? पाहा तिचे व्हायरल फोटो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 12:52 PM

Viral Photos of Sologamy Girl From Gujarat Kshama Bindu Celebrating Karwa Chauth : तिच्या आताच्या पोस्टलाही बरेच लाईक्स आले असून अनेकांनी तिच्या या पोस्टवर काही ना काही कमेंटस केल्या आहेत.

स्वत:शीच लग्न करणारी भारतातील पहिली व्यक्ती म्हणून बरीच चर्चेत आलेली क्षमा बिंदु आपल्यातील बहुतेकांना माहित आहे. जून २०२२ मध्ये तिने स्वत:शीच लग्न करत एक वेगळेच रेकॉर्ड केले. याच क्षमाने आता आपला पहिला करवा चौथही साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्यानंतर ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. अवघ्या २४ वर्षांच्या असणाऱ्या क्षमाने लाल रंगाची साडी नेसून आपला पहिला करवा चौथ सण साजरा केला. या पोस्टला कॅप्शन देताना क्षमा म्हणते, “आज मी माझा पहिला करवा चौथ साजरा केला. मी जेव्हा स्वत:ला आरशात पाहिले तेव्हा मला माझा गमावलेला अभिमान पुन्हा दिसला. हॅपी करवा चौथ” (Viral Photos of Sologamy Girl From Gujarat Kshama Bindu Celebrating Karwa Chauth).

(Image : Google)

क्षमाचे सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोअर्स असून ती सतत आपले फोटो किंवा व्हिडिओ शेअर करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या आताच्या पोस्टलाही बरेच लाईक्स आले असून अनेकांनी तिच्या या पोस्टवर काही ना काही कमेंटस केल्या आहेत. गुजरातमध्ये राहणारी क्षमा बिंदू ही तरुणी एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. अशाप्रकारे लग्न करण्यासाठी तिच्या घरच्यांचा पाठिंबा होता. ते आणि आपले काही मित्रमंडळी यांच्यासोबत तिने हा लग्नसोहळा पार पाडला होता. सुरुवातीला भटजींच्या मदतीने विधीवत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र भटजींनी हे लग्न लावण्यास नकार दिल्याने क्षमाने टेपवर मंत्र वाजवून हा लग्नसोहळा पार पाडला. 

लोक ज्याप्रमाणे आपले प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात त्याप्रमाणे माझे स्वत:वर प्रेम आहे म्हणून मी स्वत:शीच लग्न करत आहे असे क्षमाने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. क्षमाचे लग्न ही भारतातील पहिली घटना असली तरी परदेशात याआधी काही सेलिब्रिटींनी अशाप्रकारे लग्न केले आहे. स्वत:शी लग्न करण्यातून साध्य काहीच होणार नाही हे खरं असलं तरी आपण यातून स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देत असल्याचं क्षमा हिचं म्हणणं आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया