महागाई दिवसेंदिवस वाढत असताना शिक्षणाचा खर्चही वाढत असल्याचे चित्र आहे. शाळेची फी हा पालकांपुढील एक मोठा प्रश्न झालेला आहे. आपल्या मुलाला किंवा मुलीला अगदी नर्सरीमध्ये घालतानाही लाखांमध्ये फी घेतली जात असल्याने पालक हैराण झाल्याचे आपण पाहतो. इतकी फी घेऊन वेगळं काय शिकवतात असा साहजिक प्रश्नही अनेक पालक उपस्थित करताना दिसतात. सोशल मीडियावर नुकतेच एका शाळेच्या फीचे स्ट्रक्चर व्हायरल झाले आहे. ही फी नर्सरीची असून ती दिड लाखाच्या आसपास असल्याचे दिसते (viral post on social media about nursery students admission fees) .
कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. जगदिश चतुर्वेदी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली असून त्यांनी या पोस्टमध्ये ज्युनियर केजीचे फी स्ट्रक्चर यामध्ये दिले आहे. यामध्ये संपूर्ण फीचे डीटेल्स दिलेले असून मूळ फी फक्त ५५, ६३८ रुपये इतकीच आहे. तर रिफंड करण्यात येणारी फी ३०,०१९ रुपये, वार्षिक चार्जेस २८,३१४ रुपये, डेव्हलपमेंटल फी १३,९४८ रुपये आहेत. तर ट्यूशन फी २३,७३७ रुपये असून पालकांच्या ओरीएंटेशनसाठी शाळा ८,४०० रुपये घेत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. हे सगळे मिळून शाळेनी एकूण १ लाख ५१ हजार ६५६ रुपये फी लावली आहे.
8400 INR parent orientation fee!!!
— Jagdish Chaturvedi (@DrJagdishChatur) October 22, 2024
No parent will ever agree to pay even 20% of this for a Doctors consultation..
I am planning to open a school now 😁 pic.twitter.com/IWuy3udFYU
डॉक्टरांनी ट्विटरवर या फी स्ट्रक्चरचा फोटो शेअर केला असून त्यावर असंख्य पालकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पॅरेंट ओरीएंटेशनच्या २० टक्के फी डॉक्टरांना द्यायला कोणीही पालक तयार होणार नाहीत असं म्हणत आता मीही एक शाळा उघडायचे नियोजन करत असल्याचे डॉक्टर चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. ते स्टँड अप कॉमेडीयन असून त्यांची ही पोस्ट २ दिवसांत ९६ हजारांहून जास्त जणांनी पाहिली आहे. तर जवळपास ३८० जणांनी ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. बऱ्याच पालकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या असून मुलांची फी आणि त्यातून वेगवेगळ्या कारणास्तव घेतले जाणारे पैसे हा सध्या कळीचा प्रश्न असल्याचे यातून दिसून आले आहे.