भारतीय पदार्थांमध्ये जेवढी विविधता आहे तेवझी जगात कुठेच पाहायला मिळणार नाही. दर काही कोसांवर संस्कृती बदलत असल्याने याठिकाणचे वेगवेगळे पदार्थ त्या त्या भागात प्रसिद्ध असतात. यामध्ये रोजच्या जेवणाच्या पदार्थांपासून ते गोडाधोडाच्या पदार्थांपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश होतो. जगभरात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भारतीय पदार्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आपल्याला या पदार्थांची, त्यांच्या चवींची ओळख असली तरी परदेशी लोकांसाठी आपले पदार्थ अतिशय वेगळे असतात. परदेशात नॉनव्हेज आणि ब्रेड किंवा बेकरी प्रॉडक्ट जास्त प्रमाणात खाल्ले जातात. इतकेच नाही तर सलाड, मसालेदार नसलेले पदार्थ त्याठिकाणी जास्त खाल्ले जात असल्याने त्यांना आपले मसालेदार किंवा चटपटीत पदार्थ आवडतात. अनेक वेळा आपण सोशल मीडियावरही अशाप्रकारे भारतीय पदार्थांचे कौतुक करणाऱ्या परदेशी लोकांचे व्हिडिओ किंवा फोटो पाहतो (Viral Video Foreign Girl Trying Son papdi watch her Reaction ).
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक ऑस्ट्रेलियन तरुणी अतिशय आवडीने भारतीय पदार्थांची चव चाखताना दिसत आहे. प्रत्येक पदार्थ खाल्ल्यावर ती देत असलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. ही तरुणी पहिल्यांदाच भारतीय पदार्थांचा आस्वाद घेत असून तिचे नाव तन्नार असे आहे. पेशाने कंटेंट क्रिएटर असलेली तन्नार सुरुवातीला बाकरवडी खाते. त्याला ती दालचिनी रोल म्हणते आणि ते चवीला खूपच छान असल्याचेही ती सांगते. त्यानंतर ती नटक्रॅकर म्हणजेच खारे दाणे खाताना दिसते. एक एक पॅकेट फोडून ती त्यातले स्नॅक्सचे पदार्थ ट्राय करताना दिसत आहे. त्यानंतर ती सोनपापडी खाते आणि त्याला ती हार्ड कॉटन कॅंडी म्हणते. आतापर्यंत आपण खाल्लेली सगळ्यात मस्त गोष्ट असे सोनपापडीचे वर्णन करते.
त्यानंतर ती खारी पुरी, केळ्याचे वेफर्स, चकली स्टीक्स, कुरकुरे, चिप्स, तळलेले वाटाणे, मटरी, खारी, फणसाचे तळलेले गरे, बटाट्याची शेव, कोकम सरबत, कैरीचं लोणचं असं बरंच काय काय ट्राय करते. प्रत्येक पदार्थाचा सुरुवातीला वास घेऊन त्यानंतर तो पदार्थ ट्राय करणाऱ्या या तरुणीच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. व्हिडिओच्या शेवटी ही तरुणी या सगळ्यात आपल्याला सगळ्यात जास्त आवडलेला पदार्थ सोनपापडी असल्याचे सांगते आणि ‘इंडिया मी तुझ्यावर इंप्रेस झाले आहे’ असेही म्हणते. त्यामुळे या तरुणीला सगळेच पदार्थ आणि विशेषत: सोनपापडी किती आवडली असेल याची आपण कल्पना करु शकतो. तिच्या या प्रतिक्रियांवर भारतीयांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या असून तुझ्याइतकीच मलाही सोनपापडी आवडली आहे. आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे किंवा अशाप्रकारे तुम्ही भआरतीय पदार्थ ट्राय करताय हे खूप कौतुकास्पद आहे असे बरेच काही काही लिहीले आहे. फेसबुकवर ५ लाख ४२ हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून १६ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे.