आपलं मूल शाळेत जातं आणि चांगला अभ्यास करतं म्हणजे ते हुशार आहे असं आपण मानून चालतो. पण अभ्यास आला म्हणजेच आपण शिकलो असे नाही. तर आपल्याला व्यवहारात वागण्याचे, बोलण्याचेही ज्ञान असायला हवे. शिक्षण घेतल्याने हे ज्ञान मिळेलच असे नाही. हाच विचार करुन शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचा वेगळा तास घेतला जातो. या तासाकडे आपल्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नसले तरी इतर देशांत मात्र मुलांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, आपतकालिन परिस्थितीत काय करावे, किमान औषधोपचार यांबाबतचे शिक्षणही या मुलांना दिले जाते (Viral Video How Children’s Are Taught Manners in Japanese Schools).
सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये जपानमधील एका शाळेत मुलांना सार्वजनिक वाहतूकीबाबतचे मॅनर्स शिकवताना दिसते. नाट्य रुपात मुलांना अतिशय महत्त्वाचा धडा दिला जात आहे. साधारण ३ ते ४ वर्षाच्या काही मुलांना बसमध्ये बसतो त्याप्रमाणे खुर्च्यांवर बसवण्यात आले आहे. तर बाजूने एक वयस्कर आजोबा येतात, तेव्हा एक मुलगा उठतो आणि त्यांना जागा देतो. इतकेच नाही तर एक गर्भवती महिला आणि एक लहान मूल घेतलेली महिला येते. त्यांनाही आधीपासून सीटवर बसलेली मुले जागा देतात आणि स्वत: उभे राहतात.
This is a ‘courtesy lesson’ taught to elementary school children in Japan. pic.twitter.com/07VKivGZe9
— Awanish Sharan (@AwanishSharan) December 8, 2022
अवघ्या पावणेदोन मिनीटांच्या या व्हिडिओमधून जपानमध्ये मुलांना कशाप्रकारे सौजन्याचे धडे दिले जातात हे आपल्याला दिसते. प्रसिद्ध सनदी अधिकारी अवनिश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. अवनिश नेहमी अशाप्रकारचे काही ना काही संदेश देणाऱ्या गोष्टी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. या व्हिडिओला १ लाख ४० हजारांहून अधिक व्ह्यूज आले असून असंख्य जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. काहींनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. आपल्या देशातही अशाप्रकारचे शिक्षण द्यायला हवे, जपानी लोक इतके शिस्तीचे का असतात त्याचे हे कारण आहे अशा प्रतिक्रिया अनेकांनी यावर व्यक्त केल्या आहेत.