कर्तव्य आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी सोबतच सांभाळण्याची कसरत प्रत्येक वर्किंग वुमनला (working women) करावी लागते. कामाच्या ठिकाणी असताना घरी असलेल्या किंवा डे केअर सेंटरमध्ये असणाऱ्या बाळाचा विचार कितीदा तरी मनात डोकावूनच जात असतो. पण या एका आईची मात्र गोष्टच वेगळी. म्हणूनच तर ही आसाम मधली आई सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
तर त्याचं झालं असं की आसाम येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल सच्चिता राणी रॉय (Sachchita Rani Roy) यांची काही महिन्यांपुर्वी डिलिव्हरी झाली. प्रसुतीच्या काळात प्रत्येक वर्किंग वुमनला मिळते त्याप्रमाणे त्यांनाही ६ महिन्यांची रजा मिळाली. पण रजा संपल्यानंतर मात्र त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. सच्चिता राणी रॉय यांच्या घरी बाळाला सांभाळायला दुसरे कुणीच नाही. तिचे पती सीआरपीएफ जवान असून त्यांची पोस्टींग आसामच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यांनी आणखी काही काळ रजा वाढवून द्यावी, असे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना लिहिले. पण पुढची रजा अजून मंजूर न झाल्याने व आधीची रजा संपल्याने त्यांना कामावर हजर रहावे लागले.
कामावर गेल्यावर बाळाची देखभाल करणार कोण, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. म्हणून मग त्यांनी चक्क बाळाला घेऊनच कामावर जॉईन व्हायचे ठरवले. बाळालाही सांभाळायचे आहे आणि नोकरीही करायचीच आहे, म्हणून या दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. सकाळी १०: ३० ते सायंकाळी ६ असे त्यांचे कामाचे तास असतात. या संपूर्ण काळात जे काही काम करावे लागते, ते सगळे काम त्या बाळाला सोबत घेऊनच करतात. फिरायचे काम असले की बाळाला कांगारू बॅगमध्ये टाकून स्वत:सोबत ठेवतात. अशा पद्धतीने काम करणाऱ्या या आईला अनेकांकडून प्रोत्साहन मिळत आहे. ऑफिसमधले सहकारी मदत करतात, त्यामुळे काम करणे सोपे जाते, असेही सच्चिता राणी यांनी सांगितले.