Join us  

शाब्बास पोरा! पडणाऱ्या आईला वाचवण्यासाठी चिमुकल्याने लढवली शक्कल, पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 12:11 PM

Viral Video Little Boy Saving his Mother Viral Video : मुलाच्या हजरजबाबीपणाचे आणि हिमतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच

ठळक मुद्देया मुलाच्या हिमतीची आणि समजेचे जितके कौतुक करु तितके कमी आहे लहानग्याने प्रसंगावधान राखत आईचे असे वाचवले प्राण

लहान मुलांच्या कारनाम्याबाबत आपण नेहमी काही ना काही वाचतो किंवा ऐकतो. दिसताना लहान दिसणारी मुलं अनेकदा असं काही करुन जातात की आपल्याला त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. बरेचदा एखाद्या अपघातात लहान मुलांची कृती विशेष कौतुकास्पद ठरते आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याचे सगळीकडे कौतुकही होते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये हा मुलगा जे काही करतो ते पाहून आपल्याला त्याच्या हुशारीमुळे आश्चर्य वाटेल. आपल्या आईला अतिशय अवघड प्रसंगातून वाचवणारा हा मुलगा इतका लहान असून त्याने प्रसंगावधान राखून केलेली कृती खरंच अतिशय महत्त्वाची असल्याचे दिसते (Viral Video Little Boy Saving his Mother Viral Video). 

भारतीय पोलिस खात्यात असलेल्या दिपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक महिला शिडीवर चढून काहीतरी काम करताना दिसत आहे. शिडीच्या वरच्या पायरीवर उभे राहून काम करत असताना एकाएकी या महिलेचा पाय घसरतो आणि शिडी खाली पडते. महिला वरती असलेल्या बारला लटकते आणि मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसते. त्यावेळी हा लहान मुलगा बाजूला उभा असतो. आपली आई अशाप्रकारे लटकताना पाहून तो पटकन शिडी उचलतो आणि ती आधी होती त्याप्रमाणे लावण्याचा प्रयत्न करतो. शिडी लावल्यावर ही आई त्यावर पाय ठेवून खाली येते. 

विशेष म्हणजे हा मुलगा खूप लहान असून शिडी काहीशी जड असणार. मात्र प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्याने केलेल्या कृतीमुळे त्याची आई गंभीर प्रसंगातून वाचते. या मुलाच्या हिमतीची आणि समजेचे जितके कौतुक करु तितके कमी आहे असे या व्हिडिओला कॅप्शन देताना काबरा यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून जवळपास १ लाख ३५ हजार जणांनी तो पाहिला आहे. अवघ्या ४३ सेकंदांचा हा व्हिडिओ ६ हजारहून अधिक जणांनी लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरललहान मुलंसोशल मीडिया