हत्ती हा प्राणी बलाढ्य दिसत असला तरी तो अतिशय भावनिक आणि मायाळू प्राणी असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. जंगलात राहणारा आणि अनेकदा केवळ चित्रात किंवा टीव्हीमध्ये दिसणारा हा प्राणी पाहून आपल्याला त्याची काहीशी भितीच वाटते. मोठीच्या मोठी सोंड असलेला हत्ती अनेकदा या सोंडीने काही ना काही गमतीजमती करताना दिसतो. कधी तो सोंडेने पाणी उडवतो तर कधी सोंड आपल्या अंगावर फिरवत त्याचे प्रेम व्यक्त करतो. हत्ती आनंदात असले की सोंडेने काहीतरी उडवतानाही आपण काही वेळा पाहिले असेल. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये हत्ती पियानोच्या तालावर डोलताना दिसत आहेत (Viral Video Mother and Baby Elephant Listening Piano Music).
या व्हिडिओमध्ये एक कलाकार हत्तीण आणि तिच्या पिल्लासाठी पिआनो वाजवताना दिसत आहे. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये बार्टन नामक व्यक्ती भर जंगलात पियानो वाजवत आहे. हा व्हिडिओ थायलंडमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हा व्यक्ती पियानो वाजवत असताना एक हत्ती आणि त्याचे पिल्लू या पियानोसमोर येऊन उभे राहते. आपल्याला हे वादन आवडत असल्याचे काही भाव या दोघांच्या हालचालीतून दिसून येतात. सुरुवातीला ते पायांवर डोलताना दिसतात. मग ते आनंदाने आपले कान हलवतात. इतकेच नाही तर नंतर ते जमिनीवरची माती सोंडेत घेऊन ती हवेत भिरकवतानाही व्हिडिओमध्ये दिसते.
Piano for mother and baby elephant ❤️ video - Paul Barton Thailand pic.twitter.com/jCqrlJ7ytk
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) November 20, 2022
४५ मिनीटांच्या या व्हिडिओचे दृश्य पाहण्यासारखे असून जंगलात राहणारे प्राणी एका कलेला कशाप्रकारे दाद देतात आणि तिचा आनंद घेतात हेच यातून दिसून येते. बार्टन मूळचे युनाटेड किंग्डम येथील असून २६ वर्षांपासून ते थायलंडमध्ये हत्तींसाठी काम करतात. अंध आणि अपंग असणाऱ्या हत्तींच्या मनोरंजनासाठी ते जंगलात काही ना काही सादरीकरण करत असतात. हा व्हिडिओ बराच जुना असून आता आयएएस अधिकाऱ्यांनी ट्विटरवर शेअर केल्यामुळे तो पुन्हा व्हायरल झाला आहे. असंख्य जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून बऱ्याच जणांनी या व्यक्तीचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.