लहान मुलांचं एकटेपण, विभक्त कुटुंबांमुळे त्यांच्याशी खेळायला कोणीही नसणं आणि पालकांपासून आलेलं तुटलेपण ही गेल्या काही वर्षातील एक महत्त्वाची समस्या झाली आहे. आपल्या आजुबाजूला अशाप्रकारच्या समस्येचा सामना करत असलेली मुलं आपण पाहतोच. या मुलांचे प्रश्न अनेकदा खूपच विचार करायला लावणारे आणि खिन्न करणारे असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे कटू सत्य पुन्हा एकदा समोर आले. कोरीयामधील या व्हिडिओमध्ये असलेला ४ वर्षाचा मुलगा त्याच्या एकटेपणाविषयी, आई-वडिलांशी कनेक्ट नसण्याविषयी अतिशय निरागसपणे सांगत असल्याचे दिसते आणि ते पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही (Viral video of 4 years old Korean boy regarding bad parenting) .
इतक्या लहान मुलाला आलेले एकटेपण आणि तुटलेपण आपल्याला आतून हलवून टाकते आणि पालक असं का वागत असतील असा प्रश्न आपल्याला सतावत राहतो. व्हिडिओमध्ये हा मुलगा एकटाच खेळत असल्याचे दिसते. मी माझ्याशीच खेळतो असेही तो सांगतो. वडिलांनी आपल्याशी नीट, शांतपणे बोलावे, आईने आपल्यासोबत खेळावं आणि आपलं ऐकून घ्यावं अशा काही किमान अपेक्षा सांगताना या लहानग्याच्या डोळ्यातील पाणी लपत नाही. वाढत्या स्पर्धेत टिकायचं तर पालकांनी नोकरी करण्याला पर्याय नाही हे अगदी खरं. पण ज्या मुलांना जन्म देतो त्यांच्याशी कनेक्ट असणं, त्यांना आपला थोडा वेळ देणं, त्यांच्याशी खेळणं, त्यांना समजून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं नाही का हाच प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होतो.
This video broke me into pieces multiple times
— Anita Vams (@a__vanita) November 21, 2023
When he tried to hold his tearspic.twitter.com/DHBGJBhGhv
या सगळ्याचा मुलाच्या वाढीवर काय आणि कसा परीणाम होईल हे पालकांना का समजत नाही असा प्रश्नही नेटीझन्सनी उपस्थित केला आहे. आम्ही या मुलाला दत्तक घेतो असंही अनेकांनी या पोस्टच्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. जगात अशी वेळ कोणत्याच मुलावर येऊ नये. अशी वेळ येणार हे माहित असूनही पालक मुलांना जन्मालाच का घालतात असे एक ना अनेक प्रश्न नेटीझन्सनी उपस्थित केले आहेत. आईबद्दल प्रश्न विचारल्यावर तिला कदातिच मी आवडत नाही असं सांगताना या चिमुकल्याच्या डोळ्यात येणारं पाणी लपत नाही. अगदी सव्वा मिनीटाचा हा व्हिडिओ आपल्याला पालकत्त्वाबद्दल आतून बाहेरुन विचार करायला लावतो हे नक्की.