लहान मुलं काय उद्यागो करतील हे आपण सांगूच शकत नाही. आईची पावडर, टिकल्या, लिपस्टीक, नेलपेंट या गोष्टी तर लहान मुलांच्या अतिशय आवडीच्या गोष्टी असतात. अनेकदा आपण मुलांना ज्या गोष्टी करु नका सांगतो त्याच करुन पाहण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात असलेली उत्सुकता आणि काहीतरी करुन पाहायची उर्मी काय स्तराची असून शकते याचा अंदाज आपल्याला मुलांनी घरात ते उद्योग करुन पाहिल्यावरच येतो. आईच्या लिपस्टीक तर मुलांसाठी अगदी सामान्य खेळणं असतात. मग या लिपस्टीक घेऊन अंगभर फासणं असूदे नाहीतर लिपस्टीकने भिंतीवर किंवा आणखी कुठे रंगवणे असो (Viral Video of Child Scribbles On a Car With Lipstick).
नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये लहान मुलगा जे करतो ते पाहून कदाचित त्याच्या पालकांनाही त्याला रागवायचं की हसायचं हे समजलं नसणार. व्हिडिओमध्ये एक साधारण ३ वर्षांचा मुलगा बाबा गाडीवरुन रस्त्यावर येतो. रस्त्यावर ठेवलेली लिपस्टीक उचलतो आणि समोर असलेल्या लाल रंगाच्या कारवर त्याने गिरगोट्या ओढतो. त्यानंतर तो पुन्हा आपल्या गाडीवर बसतो आणि निघून जातो. अगदी ७ सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
अमेरिकेतील एका तरुणीने तो आपल्या अकाऊंटवर शेअर केल्याचा अंदाज असून ‘हा मुलगा एक दिवस बॉडी शॉपचा मालक होईल’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. ही कार पांढऱ्या रंगाची असून त्यावर लाल रंगाच्या लिपस्टीकने गिरगोट्या केल्याने ते अगदीच उठून दिसत आहे. अनेकांनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या असून मुलांचे कारनामे असेच असतात आणि हे खूप हास्यास्पद आहे असे म्हटले आहे. आता ही कार या मुलाच्या पालकांची आहे की आणखी कोणाची आहे हे मात्र समजू शकलेले नाही. कारच्या बाजूला इतक्या लिपस्टीक कोणी आणि का ठेवल्यात हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.