नारळ सोलणे, फोडणे आणि मग त्याचे खोबरे काढणे हे स्वयंपाकघरातील कामांपैकी एक महत्त्वाचे काम. नारळ म्हणजेच ओलं खोबरं आपण स्वयंपाकात नियमित वापरतो. कधी वाटणात तर कधी वरुन घेण्यासाठी या खोबऱ्याचा वापर करतो. भाजीला छान चव आणि घट्टपणा येण्यासाठी प्रामुख्याने कोकण, गोवा आणि कर्नाटक या कोकणकिनारपट्टीच्या भागात नारळ आवर्जून वापरले जाते. हे नारळ फोडणे थोडे जिकरीचे किंवा जोर लावण्याचे काम असल्याने बहुतांशवेळा स्त्रिया हे काम पुरुषांना सांगतात. मग तो फोडण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही वेगळी पद्धत अवलंबतो (Viral Video of Coconut Cracking Idea).
सुरुवातील नारळाच्या शेंड्या काढल्या जातात. त्यानंतर त्याचा टणक भाग फोडण्यासाठी कधी पाणी लावून एखाद्या फरशीवर तो फोडला जातो. तर कधी बत्त्याने किंवा वरवंट्याचा वापर करुन हा नारळ फोडला जातो. काही वेळा नारळाची कवटी इतकी टणक असते की ती बराच प्रयत्न करुनही फुटतेच असे नाही. पण स्वयंपाकाला नारळ लागत असल्याने आपण काही ना काही कसरत करुन हा नारळ फोडतोच. मात्र हे काम सोपे व्हावे यासाठी एका व्यक्तीने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये एका व्यक्तीने चक्क इमारतीच्या लिफ्टच्या २ दारांमध्ये नारळ एका पिशवीत घालून अडकून ठेवलेला दिसतो. जशी लिफ्टची दारे वर किंवा खाली जाण्यासाठी बंद होतात तशी ही नारळाची पिशवी वरच्या बाजूला जाते आणि मग चौकटीपर्यंत गेल्यावर ती पिशवी जोरात खाली आपटते आणि नारळाचे २ भाग होतात. सिद्धार्थ गुजर याने Sidfrompune या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओला कॅप्शन देताना तो लिहीतो ‘ही टेक्नॉलॉजी बाहेर जायला नको.’ हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला असून १.५ लाखाहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले आहे तर काही जणांनी अशाप्रकारे मशीनरीशी खेळणे चुकीचे आहे असे म्हटले आहे.