खाण्यापिण्याच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणे आणि त्यातून नवनवीन पदार्थांचा शोध लावणे ठिक आहे. पण म्हणून कोणत्याही पदार्थात कोणताही पदार्थ मिक्स केलेला पाहून अनेकदा आपले डोके फिरल्याशिवाय राहत नाही. हल्ली स्वत:ला शेफ म्हणवून घेणारे काही जण वाट्टेल ते प्रयोग करतात आणि मग त्यांना त्यावरुन ट्रोलही केले जाते. कधी चॉकलेट सामोसा तर कधी आणखी काही. मॅगीच्या बाबतीत तर अनेक प्रयोग केले जातात. आपण मॅगी मसाला घालून, चीज मॅगी, भाज्या घालून किंवा आणखी काही घालून मॅगी ट्राय केली असेल. मध्यंतरी फँटामध्ये मॅगी केल्याचा व्हिडिओही सोशल मीडयावर व्हायरल झाला होता. आता नुकताच कोल्ड कॉफीमध्ये मॅगी करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत (Viral Video Of Cold Coffee Maggi).
आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेफ एका पॅनमध्ये कोल्ड कॉफी घालताना दिसत आहे. त्यामध्ये सुरुवातीला तो मॅगी नूडल्स घालतो, त्यानंतर त्यात कांदा, कोथिंबीर आणि लाल मिरची घालतो. मग मॅगी मसाला घालून मॅगी शिजवतो. त्यानंतर कोको पावडर घालून मॅगीला फ्लेवर देण्याचा प्रयत्न करतो. इतकेच नाही तर मॅगी बाऊलमध्ये काढल्यावर त्यावर तो सॉस घालतो. त्यामुळे गोड आणि खारट अशा दोन्ही चवी असलेली ही मॅगी कशी लागत असेल याची आपण कल्पनाही करु शकणार नाही. या व्हिडिओला निवेदन करणारा व्यक्ती स्वत:ही ही काळी मॅगी कोण खाणार असा प्रश्न उपस्थित करताना दिसतो. इतकेच नाही, तर या मॅगीमध्ये एकावर एक कोणतेही जिन्नस घालणाऱ्याला तो आता करवा चौथ जवळ आला आहे तर मेहेंदीही घालून टाक असेही म्हणताना ऐकू येते.
इन्स्टाग्रामवर रेडिओ का रोहन या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओचा नेमका सोर्स कोणता ते माहित नसल्याचे म्हटले आहे. पोस्टला कॅप्शन देताना कमेंटसमध्ये RIP Maggi लिहा असेही सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे वेगळ्या पद्धतीने मॅगी करणाऱ्याला शेफ कांडी या पुरस्काराने सन्मानित करायला हवे असेही निवेदन करणाऱ्याने म्हटले आहे. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला असून हजारो जणांनी तो पाहिला आहे. अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून “अशाप्रकारचे प्रयोग करणाऱ्यांना देशाच्या बाहेर घालवायला हवे” असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्याने “दरवेळी मी विचार करतो की याहून वाईट काय असेल, तर त्या प्रत्येकवेळी हे त्याहून वाईट काहीतरी घेऊन येतात.” मॅगीशी अशाप्रकारे प्रयोग केल्याबद्दल अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.