डान्स हा अनेकांसाठी जीव की प्राण असतो. काही जणांना डान्सचे इतके वेड असते की त्यासाठी त्यांना काही निमित्तच लागते असे नाही. गाण्याचा आवाज आला की या लोकांची पाऊले थिरकायला लागतात. मग कोणतीही पार्टी, मिरवणूक नसतानाही हे लोक अगदी घरातही मनसोक्त डान्स करु शकतात. सोशल मीडियावर अशाप्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुणी अतिशय जोशात डान्स करताना दिसत आहे (Viral Video of Dance Girl Hanging on Ceiling of Roof).
व्हिडिओच्या सुरुवातीला ही तरुणी घरात जमिनीवर डान्स करताना दिसते. त्यानंतर नाचता नाचता ती अचानक घरात मागे असलेल्या मांडणीवर चढते. तिथून कपाटावर उडी मारते आणि मग ती घराच्या छताला असलेल्या खांबाला लटकते. ती या सगळ्या स्टेप्स इतक्या वेगाने करते की आपल्यालाही हा व्हिडिओ पाहून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. एखादा प्राणी ज्याप्रमाणे या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारतो त्याच पद्धतीने ती हे करतना दिसते. पंजाबी ड्रेस घालून केस मोकळे सोडून ‘प्यार दो’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसते.
इन्स्टाग्रामवर विकाश राज या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ही कोणाची बेस्ट फ्रेंड आहे? असा प्रश्न या व्हिडिओमध्ये विचारण्यात आला आहे. तर तुमच्या बेस्ट फ्रेंडला यामध्ये टॅग करा असेही व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. अवघ्या ७ दिवसांत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून ७ लाखांहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी यावर अतिशय गमतीशीर कमेंटस केल्या आहेत. हिला कोणतं व्हॅक्सिन दिलंय असा प्रश्न विचारलाय, तर काही जणांनी तिला स्पायडरमॅन म्हणत तिची चेष्टा केली आहे.