आपल्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर तो आपल्या कुटुंबातील सदस्यच असतो. घरात बहिण भावंडे ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एकत्र करतात त्याचप्रमाणे हे प्राणीही घरातील लहानग्यांसोबत मज्जा मस्ती करत असल्याचे आपण पाहतो. आपली सकाळ या प्राण्यांसोबतच सुरू होते आणि दिवसही त्यांना सोबत घेऊनच संपतो. त्यांच्यासोबत जेवणे, खाणे, झोपणे अशा सगळ्या गोष्टी आपण एखाद्या दोस्ताप्रमाणे करत असतो. इतकेच नाही तर हे प्राणीही आपल्यासोबत इतके एकरुप होतात की आपली भाषा, भावना त्यांना नकळत समजू लागतात. असाच एक क्यूट व्हिडिओ नुकताच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये एक लहान मुलगी आणि तिचा कुत्रा लपाछपी खेळताना दिसत आहेत (Viral Video of Dog Playing Hide And Seek With Little Girl).
लहान मुलांना सतत त्यांच्या वयाचे कोणीतरी खेळायला हवे असते. कधी बहिण-भाऊ नसतात तर कधी जवळपास मित्रमंडळी नसल्याने मुलं एकटी पडतात. खेळण्यांशी तरी किती खेळणार अशावेळी त्यांना कोणीतरी आपल्यासोबत खेळायला हवे असते. या चिमुकलीने आपल्या पाळीव कुत्र्यालाच हाईड अँड सिक म्हणजे लपाछपी शिकवली. व्हिडिओमध्ये पिवळ्या फ्रॉकमधील ही मुलगी आपल्या कुत्र्याला सांगते आता आपण लपाछपी खेळूय़ात. ते कुत्रेही अतिशय आज्ञाधारकपणे राज्य घेण्यासाठी जाते आणि भिंतीकडे तोंड करुन उभे राहते. मुलगी आतल्या खोलीत कुठेतरी जाऊन लपते. ती लपली का म्हणून हे कुत्रे अतिशय क्यूटपणे मागेही पाहते. पण तिचा आवाज येत नाही. पुढच्या काही वेळातच तिचा आवाज येतो आणि हा कुत्रा तिला शोधण्यासाठी धावतो.
ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ इतका क्यूट आहे की आपल्याला या कुत्र्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तानसू येजन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये ‘बेस्ट फ्रेंडस हाईड अँड सीक गेम्स खेळत आहेत.’ असे लिहीले आहे. ८ दिवसांत जवळपास २ लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर नेटीझन्सनी या व्हि़डिओला बऱ्याच प्रतिक्रिया देत हा नेमका कोणता ब्रीड आहे असेही विचारले आहे. हा व्हिडिओ परदेशातील वाटत असल्याने ते तिकडचेच कुत्रे असावे असा अंदाज आहे. अवघ्या २५ सेकंदांच्या असलेल्या या व्हिडिओला ५४ हजारांहून अधिक लाईक्स आले असून असंख्य जणांनी तो रिट्विटही केला आहे.