स्वयंपाक करणे ही एक कला आहे, अनेकांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा तो करायला अजिबात आवडत नाही. पण काही जणांना मात्र स्वयंपाक करणे मनापासून आवडते आणि ते लोक ही गोष्ट एन्जॉयही करतात. काही मुलींना तर लहान वयापासूनच स्वयंपाकाची विशेष आवड असते. सुरुवातीला आईच्या कामात लुडबूड, मग आईला मदत करायची म्हणून आणि मग आवड म्हणून या मुली कधी स्वयंपाकाला लागतात तेच कळत नाही. साध्यातला साधा पदार्थ करतानाही जीव ओतून केला तर तो उत्तम होतो आणि आपल्या हाताची चव त्या पदार्थात उतरते असं म्हणतात. पोळी किंवा भाकरी करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. आधी कणीक भिजवायची मग पोळी लाटायची किंवा भाकरी थापायची आणि मग ती नीट भाजायची. या सगळ्या क्रिया परफेक्ट असतील तरच पोळ्या-भाकरी छान होतात. पण यातली एक गोष्ट जरी कमी जास्त झाली तरी हे प्रकरण चुकते आणि मग घरातील मंडळींना आपण जे जसे केले आहे तसे खावे लागते (Viral video of girl child making bhakri on chul) .
पण आधीपासूनच थोडी थोडी सवय केली तर लग्न झाल्यावर फार अडचण होत नाही. सोशल मीडियावर नुकताच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून चुलीसमोर बसून ही मुलगी अगदी झरझर भाकरी थापताना दिसत आहे. घराच्या भिंती, चुलीची मांडणी, पाटावर बसण्याची मुलीची पद्धत यावरुन हे घर अगदी गावाकडचे आहे हे दिसून येते. या मुलीचे वयही फार जास्त नाही तर ९ ते १० वर्षाच्या आसपास असावे असे वाटते. त्यामुळे तिच्या हातात भाकरी थापण्यासाठी खरंच जोर आहे का असा प्रश्नही आपल्याला व्हिडिओ पाहून पडतो. पण ती इतक्या सराईतपणे भाकरी थापत असल्याचे पाहून आपल्याला तिचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. परातीत भाकरी थापून झाली की ती तव्यावर टाकतानाही अतिशय सराव असल्यासारखी टाकते त्यामुळे ही मुलगी इतक्या लहान वयात इतक्या छान भाकरी करत असल्याने सोशल मीडियात तिची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्रथमेश पगारे या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. माझी छोटी बहिण कशी भाकरी करते पाहा, या जेवण करायला असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. हा व्हिडिओ अगदी काही सेकंदांचा असूनही या चिमुकलीची भाकरीची कला त्यात परफेक्ट कॅप्चर झाली आहे. या व्हिडिओला साधारण महिनाभरात ९७ हजारांहून अधिक लाईक्स आले असून असंख्य जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये बहुतांश जणांनी तिचे कौतुक केले असून काही जणांनी आता तिचे खेळण्याचे आणि शिक्षण घेण्याचे वय आहे तर तिला असे काम का करायला लावले असा प्रश्न उपस्थित केला आहे. आयुष्यभर हेच काम करायचंय मग आतापासून कशाला असंही काही जणांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.