Join us  

मजुरी करणाऱ्या वडिलांना पाहून गहिवरली लेक- वर्गातच कोसळलं रडू, बघा इमोशनल व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 2:16 PM

Viral Video Of Girl Crying In Class After watching Video of Father Working as Labor : व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे येतील भरुन

ठळक मुद्देआपले वडील आपल्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून तिला भरुन येते आणि ती ओक्साबोक्शी रडताना दिसते.हा व्हिडिओ ट्विटरवर जवळपास २६ हजार जणांनी पाहिला असून अनेकांनी तो रिट्विट आणि लाईकही केला आहे. 

आपल्या प्रत्येकाचेच आई वडील आपल्याला मोठं करण्यासाठी, शिक्षणासाठी खूप कष्ट घेत असतात. दिवसभर काम करुन आपल्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तरी पैसा वाचवून ते आपल्या मुलांसाठी शक्य त्या सगळ्या गोष्टी करतात. आपल्याला हव्या त्या वस्तू, चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ते दिवसभर राबत असतात. मुलांना कसली कमी पडू नये यासाठी अनेकदा ते किती काम करतात याची आपल्याला कल्पनाही नसते. पण असे काही प्रसंग घडतात जेव्हा आपल्याला त्यांच्या कष्टाचे चीज लक्षात येते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे (Viral Video Of Girl Crying In Class After watching Video of Father Working as Labor). 

जपानमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना वर्गात एक व्हिडिओ दाखवण्यात येत असल्याचे दिसते. यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यासाठी काय करतात हे दाखवले जाते. डॉ. विकास कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना ते म्हणतात, “ आई वडील रक्ताचं पाणी करुन आपल्या मुलांना शिकवतात हे समजण्यासाठी जपानमध्ये मुलांना अशाप्रकारे आई-वडील काय करतात ते दाखवतात. जेणेकरुन मुलांनी वेळ वाया न घालवता मेहनत घेऊन अभ्यास करायला हवा. मी हा व्हिडिओ यासाठी शेअर करत आहे जेणेकरुन मुलांना आपल्या आईवडीलांच्या कष्टाची जाणीव व्हावी. 

वर्गात बसलेली सगळी मुले व्हिडिओ पाहताना दिसतात. व्हिडिओमध्ये काही पुरुष विटा उचलताना, जड पोती उचलताना किंवा अतिशय कष्टाची अशी काही कामे करताना दिसतात. सगळी मुलं हा व्हिडिओ पाहत आहेत. मात्र एक मुलगी हा व्हिडिओ पाहून गहिवरते आणि अचानक तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. आपले वडील आपल्यासाठी घेत असलेले कष्ट पाहून तिला भरुन येते आणि ती ओक्साबोक्शी रडताना दिसते. तिच्याबरोबरच वर्गातील इतरही मुले व्हिडिओ पाहताना इमोशनल झालेली दिसतात. अवघ्या ४३ सेकंदांचा हा व्हिडिओ अतिशय इमोशनल असून आपल्यालाही तो पाहताना भरुन येते. हा व्हिडिओ ट्विटरवर जवळपास २६ हजार जणांनी पाहिला असून अनेकांनी तो रिट्विट आणि लाईकही केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया