पोलिस म्हटले की आपण सगळेच घाबरतो. कधी सिग्नलवर अडवणारे तर कधी रस्त्यावर दंगा सुरू असेल तर एकेकाला दम भरणारे पोलिस आपल्याला आठवतात. त्यांच्या दांडक्याची तर आपल्याला नेहमीच भिती वाटते. लहानपणापासून पोलिस मामा येतील आणि पकडून नेतील अशी भितीही आपण लहानग्यांना घालतो. पोलिसांच्या दंडुक्याला भलेभलेही घाबरतात. मात्र ही धिटुकलीचक्क पोलिसांनाच त्यांची काठी मागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या १.५ ते २ वर्षांची ही मुलगी महिला पोलिस अधिकाऱ्याकडे हातातल्या काठीसाठी अतिशय क्यूट असा हट्ट करताना दिसते आहे. हा व्हिडिओ मुंबईतील असून या महिला पोलिस रस्त्यावर गस्तीसाठी किंवा अन्य काही कामासाठी उभ्या असाव्यात असा अंदाज आहे (Viral Video Of Girl with Police) .
ही मुलगी काठीसाठी चक्क रडत असल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. महिला पोलीस तिच्याशी हिंदीमध्ये संवाद साधत आहे. तुला काठी कशाला हवी असं विचारल्यावर ती मम्मा, मम्मा असं म्हणते. म्हणजे मम्माला मारायला असा अर्थ घेत पोलीस महिला आणि समोर उभी असलेली या मुलीची आई हसतात. मग मी मम्माला मारु का असंही पोलीस मजेनं विचारतात. एका फूटपाथवर हा प्रसंग घडत असल्याचे कॅमेरात कैद झालेले दिसते. काठीसाठी हट्ट करणाऱ्या या चिमुकलीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर नेटीझन्स बऱ्याच प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर कनिष्का बिष्नोई यांनी शेअर केला असून आतापर्यंत ७ दिवसांत ८ लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओला ‘वेट फॉर इट’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. इतकंच नाही तर जवळपास ७ लाख जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी त्यावर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंटस केल्या आहेत. एक जण म्हणतो, मुलीला रडवू नका, काठी द्या, तरच मोठी झाल्यावर तुमच्यासारखी पोलीस ऑफीसर होईल. तर दुसरा म्हणतो, पोलीस असतात हेच बिचारीला माहित नाही.