भाजी-पोळी खायचा कंटाळा आला किंवा झटपट आणि तरीही हेल्दी काही हवं असेल तर पराठा हा आपल्याकडे अगदी ठरलेला पर्याय असतो. मग यामध्ये आलू पराठा, चीज किंवा पनीर पराठा, कोबी, मुळा, दुधी यांचा पराठा किंवा पालक, मेथी कोथिंबिर अशा भाज्यांचा पराठा असे बरेच पर्याय आपण करतो. या पराठासोबत चटणी, लोणचं, बटर, दही असं काहीही असलं तरी काम होऊन जातं. आता हे सगळं ठिक आहे पण आईस्क्रीम पराठा असं तुम्ही कधी ऐकलंय? आईस्क्रीम हा उन्हाळ्याच्या दिवसांत मनाला आणि शरीराला शांत करणारा पदार्थ. एखादवेळी आपण जिलेबी किंवा गुलाबजाम यांच्यासोबत आईस्क्रीम खातो. पण इतर कोणत्याही वेगळ्या पदार्थांत आपण आईस्क्रीम मिक्स केलेले पाहू शकत नाही. मात्र लोक काय करतील याचा नेम नाही (Viral Video Of Ice cream Paratha).
नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एक महिला कॉर्नेटो आईस्क्रीमचा पराठा करताना दिसत आहे. यामध्ये चक्क पोळी लोटून त्यामध्ये कोनसहीत आईस्क्रीम ठेवून ही महिला त्याचा रोल करते. त्यानंतर हा रोल खाली दाबते आणि मग त्याचा पुन्हा पराठा लाटते. आपण इतर पराठे तूप घालून भाजतो त्याचप्रमाणे ही महिला हा आईस्क्रीमचा पराठा चक्क तव्यावर भाजतानाही दिसते. आता आईस्क्रीम हातातही पातळ होते तर तव्यावर ते विरघळत नाही का असा प्रश्नही आपल्याला पडल्यावाचून राहत नाही.
मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक या अनोख्या व्हेरीएशनला बरीच नावं ठेवताना दिसत आहेत. आता हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि हा प्रयोग कोणी केला आहे याबाबत अद्याप समजू शकले नाही. पण या विचित्र प्रयोगाबाबत मात्र नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. अवघ्या १७ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. भर उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाणे ठिक आहे पण अशाप्रकारे आईस्क्रीमचा पराठा कोण करते असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. सध्या चॉकलेट मॅगी, गुलाबजाम सामोसा असे वाट्टेल ते प्रयोग सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात आता या पदार्थाची भर पडली आहे.