लहान मुलं कधी काय करतील आणि त्यांच्या संकल्पना काय असतील याचा आपण अजिबात अंदाज बांधू शकत नाही. अनेकदा त्यांचा निरागसपणा इतका क्यूट असतो की त्यामुळे आपण काय प्रतिक्रिया द्यावी हेही आपल्याला समजत नाही. मुलं एकदा शाळेत जायला लागली की मग तर रोज शाळेतल्या मित्रमंडळींसोबतच्या तर कधी शिक्षकांबरोबरच्या गमतीजमती आपल्याला ऐकायला मिळतात. मूल मोठं होईल तसे आपले व्याप कमी होतील असं आपल्याला वाटत असतं, मात्र हे व्याप कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जातात. कधी कधी मुलं असं काहीतरी बोलतात की आपल्याला त्यांना प्रेमाने जवळ घ्यावे आणि त्यांची जोरात एक पापी घ्यावी अशीच इच्छा होते (Viral Video of little Girl and Mother Conversation).
आपण शाळेत काही केले की शिक्षिका आपल्याला एकतर शिक्षा देतात किंवा जास्तच झाले तर आपल्या पालकांना शाळेत बोलावतात. शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलावले म्हणजे आपण नक्कीच काहीतरी जास्त केले आहे हे समजून घ्यायचे असते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक लहान मुलगी तिच्या आईशी बोलत असल्याचे दिसते. ही मुलगी प्रत्यक्षात आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत नसून तिची आईच दिसत आहे, मात्र या मुलीचा आवाज येतो. काळ्या रंगाचा टि शर्ट घातलेली एक महिला आपल्याला कपातून काहीतरी पिताना आपल्या मुलीशी बोलत आहे.
ही लहानी अतिशय निरागसपणे सांगते, “मम्मी माझ्या टिचरला सोमवारी तुला भेटायचं आहे.” त्यावर आई “का भेटायचं आहे” असं विचारते. मुलगी म्हणते, “तिने मला विचारलं की, मी वर्गात तासाच्या मधे का बोलत होते.” त्यावर आई विचारते “मग तू काय म्हणालीस?” तर मुलगी अतिशय आत्मविश्वासाने उत्तर देते, “की मी तिला म्हटलं माझ्या बोलण्याच्या मध्ये तुम्ही का शिकवत आहात?” हा संवाद ऐकून आपल्याला हसू आल्याशिवाय राहणार नाही. मुलीचा स्मार्टनेस खरंच कौतुकास्पद आहे. मात्र तिने शिक्षिकेला उलटे उत्तर दिल्याने कदाचित या शिक्षिकेने तिला पालकांना शाळेत भेटायला आणण्यासाठी सांगितले असावे.