जोडीदार एकमेकांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देण्याची शपथ लग्न करताना घेतात. एरवी सगळ्या बाबतीत साथ देणारे हे दोघे जण जेव्हा वयस्कर व्हायला लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना सोबतीची आणि मदतीची गरज असते. अनेकदा आपण आजी-आजोबा एकमेकांच्या मदतीने रस्ता क्रॉस करताना किंवा एकमेकांना आधार देताना पाहतो. पण खरी मदत तर दैनंदिन कामात आवश्यक असते. स्वयंपाक हे आजही आपल्याकडे महिलांनी करायचे काम असल्याने त्यापासून त्यांना कधीच सुटका नसते. या स्वयंपाकातील कामात एका आजींना मदत करतानाचा आजोबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आजोबांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे (Viral Video of old Couple husband helping wife in Kitchen).
व्हिडिओमध्ये एक आजी कोपऱ्यात स्टूलवर बसून गॅसपाशी काहीतरी करत असल्याचे दिसते. तर या बाजुला आजोबा एका पातेल्यातून दुसऱ्या पातेल्यात काहीतरी ओतत असल्याचे दिसतात. काही वेळाने हे आजोबा हातात कांदा धरुन त्याची साले काढणे आणि तो चिरण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात. हे खरे प्रेम आहे, कितीही वय झालं तरी एकत्र काम करण्याने जीवनाचा खऱ्या रुपाने अर्थपूर्ण होते. अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. हा व्हिडिओ नेटीझन्सला खूप पसंत पडत असून तो वारंवार पाहिला जात आहे.
साधारण १ महिन्याच्या कालावधीत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ७ लाखांहून अधिक जणांनी त्याला लाइक केले आहे. तर जवळपास २ हजार जणांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “खरंच या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कौतुकास्पद आहे.” “जे नवरे आपल्या बायकांना मदत करत नाहीत त्यांना हा व्हिडिओ डेडीकेट करायला हवा.” खऱ्या प्रेमाचा अर्थ, दोघं किती गोड आहेत अशा कमेंटसही अनेकांनी केल्या आहेत. बऱ्याच जणांनी आपल्या पार्टनरला कमेंटमध्ये टॅग केले आहे.