शाळेत विद्यार्थी अनेकदा इतका दंगा करतात की त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी शिक्षिका अनेक प्रकारच्या युक्त्या वापरताना दिसतात. कधी त्यांना प्रेमाने सांगतात तर कधी शांतपणे समजावतात. कधी जास्तच दंगा केला तर ओरडतात आणि काही केल्या ऐकलेच नाही तर एखादा दणकाही देतात. काही विद्यार्थी इतके दांडगट असतात की काही केल्या ते ऐकत नाहीत आणि त्यांची दंगामस्ती सतत सुरूच असते. अशावेळी शिक्षिका अक्षरश: हतबल होतात. या दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे वर्गातील इतर मुलांचेही अभ्यासात लक्ष लागत नाही. कधी कोणाच्या खोड्या काढणे, कधी काहीतरी उपद्व्याव करणे अशात या मुलांचे अभ्यासाकडेही पुरेसे लक्ष नसते. अभ्यासासोबतच मुलांना शिस्त लावायची असल्याने शिक्षकांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागते. मुलांचे वय लक्षात घेऊन त्यांना एखादी गोष्ट कशी सांगायची हे शिक्षक ठरवतात (Viral Video of Teacher Who Angry With Student Kid Try to Kiss).
सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक शिक्षिका वर्गात हाताची घडी घालून आपल्या खुर्चीत बसल्याचे आपल्याला दिसते. तर तिच्यासमोर एक लहानगा या शिक्षिकेची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तू खूप बदमाशी करतोस त्यामुळे मी तुझ्याशी बोलणार नाही अशी ही शिक्षिका या लहानग्याला म्हणत आहे, तर आता मी असे वागणार नाही असे हा लहानगा शिक्षिकेला वारंवार सांगताना दिसतो. मात्र तू असं म्हणतोस आणि पुन्हा तसंच करतोस असं ही शिक्षिका या मुलाला म्हणते. या दोघांमध्ये बराच वेळ हाच संवाद सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मुलगा शिक्षिकेने आपल्याशी बोलावे यासाठी तिला खूप मस्का लावत असल्याचे दिसते. यावेळी तिचा राग घालवण्यासाठी तो तिच्या गालावर प्रेमाने पापीही देतो. तरी शिक्षिका काही केल्या मनत नाही. मग पुन्हा तिला समजावून तो पापी देतो तेव्हा ती आणखी मोठी आणि दुसऱ्या गालावरही पापी मागते. मग अखेर तो आता दंगा करणार नाही या नोटवर त्यांचे संभाषण थांबते.
हा पूर्ण व्हिड़िओ या क्लासरुममध्ये उपस्थित असलेल्या कोणीतरी आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याचे दिसते. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ काही वेळात वेगाने व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ट्विटरवर ChapraZila या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना अशी शाळा माझ्या लहानपणी का नव्हती असे म्हटले आहे. एका दिवसांत १० लाखाहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३७ हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. असंख्य जणांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे.