व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणत असतानाच व्यक्ती तितक्या प्रतिभा असेही आपण म्हणू शकतो. कारण कोणाकडे काय प्रतिभा असेल याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे स्केटींगवर राजस्थानी डान्स करणारी महिला. या महिलेचा व्हिडियो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या महिलेचे नाव कृष्णा कंवर गहलोत असे असून रोलर ब्लेडवर ती अतिशय सराईतपणे डान्स करताना दिसत आहे. कृष्णा पेशाने स्केटींगची खेळाडू असून तिने पारंपरिक वेश परिधान करुन स्केटींगवर सदर डान्स केला आहे. जड असा लेहंगा घालून सामान्य डान्स करणे हिच एक अवघड गोष्ट आहे. त्यात अशाप्रकारे स्केटींगवर उभे राहून डान्सच्या स्टेप्स करणे वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण कृष्णा यांनी ते प्रत्यक्षात करुन दाखवले आहे.
उदयपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सजलेल्या अवस्थेत लाल रंगाचा लेहंगा परिधान करुन हा डान्स सादर केला. या लेहंग्याला पोषाख म्हणून ओळखले जाते. यामध्ये लेहंग्याबरोबरच दागिने, बांगड्या असे सगळे घालून त्या डान्स करत आहेत. त्यांच्या या डान्सचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठेया प्रमाणात व्हायरल होत असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कृष्णा यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड, एशिया बुक रेकॉर्डबरोबरच इतरही अनेक रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवले आहे. भारतीय सैन्य आणि महिला सबलीकरणासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी कृष्णा यांनी उदयपूर ते दिल्ली असा ७५० किलोमीटरचा प्रवास केल होता.
तिचे आताच्या कार्यक्रमातील डान्सचे व्हिडियो ट्विंकल बैसा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आतापर्यंत अनेकांनी हे व्हिडियो पाहिले असून बऱ्याच जणांनी तिच्या या अनोख्या टॅलेंटबद्दल तिचे कौतुकही केले आहे. तर नेटीझन्सनी या व्हिडियोवर प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. डान्समधील अवघड अशा स्टेप्स ती स्केटींग ब्लेडवर अतिशय लिलया करत असल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा स्केटींग ब्लेडवरचा डान्स तुम्ही याआधी नक्की पाहिला नसणार...