कधी एखादा पक्षी झाडावर किंवा एखाद्या तारेवर अडकल्याचे आपण पाहतो. मग त्याला वाचवण्यासाठी कधी अग्निशामक दलाचे जवान तर कधी वनखात्याचे लोक प्राणाची शर्थ करताना दिसतात. अखेर हा मुका जीव वाचल्यावर आपल्या जीवात जीव येतो. पण अशातऱ्हेने माणूस इतक्या उंचावर अडकला तर काय? अशीच एक घटना नुकतीच दिल्लीत घडली आणि पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एक लहान मुलगी मेट्रो स्टेशनच्या ग्रीलमध्ये अडकली होती. तिचा रडण्याचा आवाज आल्याने बराच वेळाने प्रवाशांचे याठिकाणी लक्ष गेले आणि तिला सुखरुप खाली उतरवण्याचे प्रयत्न करण्यास सुरुवात करण्यात आली.
त्याचे झाले असे की, रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निर्माण विहार मेट्रो स्थानकावर एक मुलगी खेळत असताना जमिनीपासून सुमारे २५ फूट उंचीवर असलेल्या रेल्वेच्या ग्रीलजवळ पोहोचली. लहान मुलांना जीने, जीन्यांचे रेलिंग यावर खेळायला आवडते. अनेकदा आपल्या पालकांचे लक्ष चुकवून मुले असे प्रकार करतात पण ते त्यांच्या जीवावर बेतणारे ठरतात. २५ फूट उंचावर पोहोचल्यानंतर या मुलीला आपली चूक लक्षात आली. इतक्या उंचीवर पोहोचल्यावर तिल्या खाली येण्यासाठी मार्ग सापडेना. तिचा पाय थोडा जरी सटकला असता तर ती इतक्या उंचीवरुन खाली पडण्याची शक्यता होती. तिने थोडा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर ती जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले, त्यानंतर उपस्थित लोकांनी सीआयएसएफच्या (CISF) जवानांना याची माहिती दिली.
सी आई एस एफ का नायक!
— CISF (@CISFHQrs) February 28, 2022
On 27.02.22 a kid got stuck in grills while playing in unpaid area @ Nirman Vihar Metro Station. CT/GD Nayak of CISF QRT Team responded promptly and saved the child. #PROTECTIONandSECURITY#SavingLives@HMOIndia@AmitShah@MoHUA_Indiapic.twitter.com/F4QBYEOOMc
यानंतर, सीआयएसएफचे जवान अतिशय अरुंद मार्ग असलेल्या या रेलिंगवरून सावधपणे चालत मुलीजवळ आले. एका हातात मुलीला पकडले आणि दुसऱ्या हाताने रेलिंगचा आधार घेत या जवानाने अतिशय सावधपणे या मुलीला किनाऱ्यावर आणले. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर मुलगी आईजवळ पोहोचल्यानंतर शांत झाली आणि तिची आई खूश झाली. या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्य़ात आला असून तो व्हायरल झाला आहे. ही मुलगी मेट्रो स्टेशनच्या खाली राहते आणि खेळता खेळता ती वर पोहोचली असे सांगितले जात आहे मात्र तिचे नाव किंवा तिच्या आईवडिलांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र जवानांनी अतिशय तातडीने आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून केलेल्या या कामाचे उपस्थितांकडून आणि नेटीझन्सकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले.