रस्ता क्रॉस करताना आपल्याकडे आजही कोणतेच नियम पाळले जात नाहीत. पिवळा सिग्नल असताना रस्ता क्रॉस करायचा असतो हे माहित असूनही आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो आणि आपल्याला पाहिजे तसे गाड्या वेगाने येत असल्याचे दिसत असतानाही घाईने पुढे जातो. आपल्याकडे नियम हे अपवादाने पाळले जातात असे म्हणतात हे काही खोटे नाही. रस्त्याने जाताना अनेकदा आपल्याला ‘अति घाई संकटात नेई’ अशा आशयाचे संदेश लिहीलेले दिसतात. मात्र आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. घाई केल्याने होणारे दुचाकीचे किंवा हायवेवर चारचाकी किंवा ट्रकच्या अपघाताबाबत आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो. काही अपघात तर आपल्या डोळ्यांदेखत घडतात. त्यामुळे आपण जास्त काळजी घ्यायला हवी असेही आपल्याला वाटते. मात्र बेजबाबदारपणे वागणारी काही मंडळी आपल्या आजुबाजूला असतात (Viral Video Woman Walking Carelessly On Busy Road Causes Accident).
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तीन महिला एका मोठ्या रस्त्याने रस्ता ओलांडताना दिसत आहेत. यामध्ये २ महिला मागे थांबतात मात्र १ महिला अतिशय घाईने पुढे जाते. आजुबाजूला न पाहता पुढे जाणारी ही महिला अतिशय बिनधास्त असल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र या महिलेच्या डावीकडून भरधाव वेगाने चारचाकी गाड्या येताना दिसतात. सुरुवातीला एक पांढऱ्या रंगाची गाडी वेगाने महिलेच्या दिशेने येते. पण तिचा जीव वाचवण्याच्या नादात हा कारचालक गाडीचा वेग काहीसा कमी करतो. मात्र मागून आलेली दुसरी काय या कारवर जोरदार आपटते. यामध्ये सुदैवाने या महिलेचा जीव थोडक्यात वाचतो. पण महिलेचा जीव वाचवण्याच्या नादात या दोन्ही गाड्या इतक्या जोरात एकमेकांवर आपटतात की अक्षरश: गाडीच्या काही भागाचे तुकडे तुकडे झाल्याचे आपल्याला दिसते. विशेष म्हणजे या गाड्या इतक्या वेगात असतात की त्यांचा ब्रेक लागेपर्यंत त्या बऱ्याच पुढे गेल्याचेही आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.
‘मिरर नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देताना महिलेच्या बेजबाबदारपणे रस्ता ओलांडण्याला यासाठी कारणीभूत धरले आहे, तर काहींनी गाड्यांचा वेग खूपच जास्त असल्याने असे घडल्याचे म्हटले आहे. ही घटना नेमकी कुठे घडली हे समजू शकले नसले तरी हा रस्ता रहदारीचा असून त्याठिकाणी बऱ्याच गाड्या वेगाने जाताना दिसत आहेत. भारतासारख्या देशामध्ये आजही रस्त्यांवर घड़णाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.