एकेकाळी बॉलिवूडमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री समीरा रेड्डी हिने वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. लग्नानंतर समीराने बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले. दोन मुलांची आई असलेल्या समीराने कालच तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त तिने काही विषयांवर आपली मते व्यक्त केली. ती म्हणते, सोशल मीडियामुळे मी मोकळी झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून समीरा शारीरिक सकारात्मकता आणि मानसिक आरोग्याविषयी प्रेरणा देते. प्रेक्षक मला नेहमी म्हणतात मी त्यांना प्रेरणा देते, पण त्यांनी मला मोकळे केले आहे. सोशल मीडिया हा माझ्यासाठी उपचार असून त्याने मला मी माझी असण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सोशल मीडियाकडे मी कधीही दबाव म्हणून पाहात नाही तर मला ते आवडते. माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि मला कसलीही भिती नाही म्हणून मी त्या माध्यमातून व्यक्त होत असते असेही ती पुढे म्हणते. सोशल मीडियावर समीराचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून तिच्या पोस्टना भरपूर लाईक्स मिळत असतात. नेटीझन्सशी ती अतिशय चांगल्या पद्धतीने इंटरअॅक्ट होण्याचा प्रयत्न करत असते.
मी माझ्या ४० पर्यंतची अनेक वर्षे वाया घालवली. मी माझी विशी आणि तिशी लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात वाया घालवली. मला सतत माझ्या शरीराची, माझ्या प्रतिमेची काळजी वाटायची. मी यशाची आणि पैशांची चिंता करण्यातही अनेक वर्ष घालवली. मी सतत कोणीतरी होण्याचा प्रयत्न करत होते, मी आजही खूप आशादायी आणि महत्त्वाकांक्षी आहे. पण माझे आरोग्य, माझा आनंद आणि स्वत:शी प्रामाणिक असणे ही माझी किमान गरज आहे. मी लोकांनाही हाच सल्ला देईन की त्यांनीही आपल्याला आयुष्यात नक्की काय हवे ते शोधायला हवे. तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी झटू नका असे मी म्हणत नाही, पण ही प्रवास कसा आणि कोणत्या मार्गाने करता त्याकडे लक्ष द्या. गेल्या काही काळापासून समीरा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे स्ट्रेच मार्क्स, पांढरे केस, लठ्ठपणा यांबाबत खुलेपणाने बोलताना दिसते.
समीराने १९९७ मध्ये गझल गायक पंकज उधास यांच्या म्यूझिक व्हिडिओव्दारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर २००२ मध्ये मैने दिल तुझको दिया या सिनेमाद्वारे बॉलिवूमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली. डरना मना है, नो एन्ट्री, मुसाफिर, प्लान, टॅक्सी नंबर 9 2 11 आणि दे दना दन या चित्रपटांमध्ये ती झळकली. २०१२ मध्ये प्रकाश झा यांच्या चक्रव्यूह सिनेमामध्ये ती शेवटची दिसली. त्यानंतर २०१४ मध्ये समीराने उद्योगपती अक्षर वर्देसोबत विवाह केला. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यावर अजिबात दिसली नाही. सध्या समीरा तिच्या सासूबाईंसोबत एक यूट्यूब चॅनेल चालवते. यावर त्या खाण्याचे आणि इतर काही व्हिडियो शेअर करत असतात.