लग्नसराईचा काळ म्हटला की खरेदी आपसूकच आली. आजकाल आपल्याकडे विवाह सोहळाही उत्सवापेक्षा काही कमी नसतो. कौटुंबिक मेळाव्यापासून ते स्वयंपाक आणि खरेदीपर्यंत, लग्न समारंभाला खास बनविणाऱ्या सगळ्या गोष्टींची आपण आवर्जून खरेदी करतो. यावेळी प्रत्येकाला कपडे घालण्याची, भरपूर नाचण्याची आणि मनमोकळेपणाने खाण्याची संधी मिळते. लग्न कोणाचेही असो, ती सर्वात अनोखी वधू दिसावी आणि लग्न समारंभात तिच्यावरून कोणाचीही नजर हटू नये, अशी प्रत्येकीची इच्छा असते. म्हणूनच लग्नाचे कपडे खास असतात आणि ते खरेदी करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेतला असेल आणि आपण वधू होणार असाल, तेव्हा आपल्या या स्पेशल दिवसाचा पोशाख इतरांपेक्षा हटके असावा अशी आपली इच्छा आहे.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका हटके लग्नाच्या गाऊन बद्दलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नक्की हा वेडिंग गाऊन आहे तरी काय? हा वेडिंग गाऊन कशापासून तयार झाला आहे. या वेडिंग गाऊनमध्ये नक्की असे काय आहे की ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे(Woman Makes Largest Wearable Cake Dress, Sets Guinness World Record).
या मुलीने परिधान केला केकचा वेडिंग गाऊन...
स्वित्झर्लंडमधील नताशा कोलाईन किम फाह ली फोकस (Natasha Coline Kim Fah Lee Fokas) हिने स्विस वर्ल्ड वेडिंग फेअरमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. स्विस वर्ल्ड वेडिंग फेअरमध्ये नताशाने चक्क केकपासून तयार केलेला एक मस्त पांढरा शुभ्र वेडिंग गाऊन परिधान केला आहे. तिने परिधान केलेला हा वेडिंग गाऊन केक आणि क्रीमपासून तयार झाला आहे.
वेडिंग गाऊन बद्दल अधिक माहिती...
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार, यावर्षीच्या दिनांक १५ जानेवारी २०२३ पासून तिने हा केक बनविण्यासाठीच्या इतर महत्वाच्या घटकांना तयार करण्यास सुरुवात केली. या वेडिंग गाऊन ड्रेसचा घेर ४. १५ मीटर, उंची १.५७ मीटर आणि व्यास १. ३१९ इतका आहे. या वेडिंग गाऊनचा स्कर्ट तयार करण्यासाठी त्या स्कर्टला सपोर्ट म्हणून त्याच्या आत अल्युमिनियनची पातळसर फ्रेम लावली आहे. हा केक एकाच जागी स्थिर राहून जागचा हलू नये म्हणून त्यात एक बोर्ड असा बसवला आहे की त्यामुळे केक एकाच जागी स्थिर राहतो. केकचा ड्रेस परिधान करणाऱ्या मॉडेलला तो सहज घालून चालता यावं म्हणून ड्रेसच्या खालच्या बाजूला चाके लावण्यात आली आहेत. ड्रेसचा वरचा भाग हा साखरेच्या पेस्टपासून तयार करण्यात आला आहे.
या केकची कल्पना कशी सुचली...
स्वीटी केक्स (Sweety Cakes) च्या संस्थापक नताशा कोलाइन किम फाह ली आपल्याला या केकची कल्पना कशी सुचली हे सांगताना म्हणतात, काही वर्षांपूर्वी मी माझ्या छोट्याश्या केक स्टुडिओमध्ये विविध प्रकारचे केक तयार करायचे. असच एके दिवशी माझ्या लहानश्या केक स्टुडिओच्या मागच्या अंगणात एक लग्नाचा केक सजविण्यात मग्न होते. हा लग्नाचा केक सजवत असतानाच माझ्या डोक्यात अचानक चटकन एक विचार येऊन गेला की, लग्नाचा संपूर्ण पोशाखच जर केक पासून तयार केला असेल तर, किती छान होईल? ही विलक्षण कल्पना डोक्यांत येताच ती सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मग पुढील काही दिवस त्यांची धाकटी मुलगी एली हीच त्यांची मॉडेल होती. एलीला घेऊन त्यांनी तिच्यासाठी केकचा गाऊन तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले. या प्रयत्नातून त्यांना आपण कुठे चुकतो आहोत, काय प्रकारच्या अडचणी येत आहेत याचा अंदाज येत गेला. हा केक तयार करताना त्वचेच्या भागावर हा केक किंवा क्रिम कशी लावणार हा सगळ्यांत मोठा टास्क होता. तसेच हा ड्रेस आहे तसा व्यवस्थित अंगावर बसला पाहिजे, यासाठी देखील त्यांनी खूप प्रयत्न केले. हा ड्रेस तयार करणे हे जणू काय त्यांच्यासाठी खूप मोठे आव्हानच होते. परंतु मी प्रयत्न करतच राहिले आणि माझ्या या प्रयत्नांना पहिल्याच प्रयत्नांत यश मिळाले. "माझ्या या पहिल्याच प्रयत्नांत मला यश मिळाले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे याची दखल घेत माझ्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करून घेतली". त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे म्हणत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आभार व्यक्त केले आहेत.
नक्की काय आहे या व्हिडीओत...
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून नताशा कोलाइन किम फाह ली यांचा केकपासून तयार केलेल्या वेडिंग गाऊनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रॉयल आयसिंग क्रिम आणि केक पासून तयार केलेला ड्रेस, त्यावर फुलांची डिजाइन असा वेडिंग ड्रेस घातलेली मॉडेल दाखवली आहे. तसेच या मॉडेलच्या आसपास असणारे लोक त्या केकच्या स्लाईसचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
कॅप्शनमध्ये काय म्हटले आहे?
सगळ्यांत मोठा, परिधान करण्यायोग्य केक : नताशा कोलाईन किम फाह ली फोकस हिने १३१. १५ किलो वजनाचा सर्वात मोठा परिधान करण्यायोग्य केक ड्रेस तयार करून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. एक दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टला १.३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि ४६००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टने नेटकऱ्यांना आपले विचार मांडण्यास प्रवृत्त केले आहे.
नेटकरी काय म्हणत आहेत...
"ओह्ह... तिच्याकडे केक आहे...." , "हे अविश्वसनीय आहे.." "तिच्या खांद्यावर इतके वजन घेऊन ती फिरू शकली हे खूपच कौतुकास्पद आहे".. , “'केक कुठे आहे?'... 'तिने तो घातला आहे,', "हे छान आहे!! मी ते खाल्ले नसते,”... अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ बघून दिल्या आहेत.