छान, चवदार लाडू असे मस्त गोलाकार किंवा चौकोनी- चापट वळलेले असतात, की लाडवाचा आकार पाहूनच अनेकदा ते खावेसेवाटतात. पण इथे तर या महाशयांनी लाडूचा सगळा खेळच बिघडवून टाकला आहे. लाडू खाण्याची किंवा हवं तर पिण्याची म्हणा.. एक नवीनच युक्ती एका जणाने शोधून काढली आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर लाडू चांगलेच गाजत आहेत..
foodie_blest या इन्स्टाग्राम (instagram share) पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चक्क एका शेफने लाडू मिल्कशेक बनविला आहे. बदाम शेक, मॅंगो शेक, चिकू शेक आजवर तुम्ही ऐकले आणि चाखूनही पाहिले. पण लाडवाचाही कधी मिल्कशेक होऊ शकतो, हा विचारही आपल्या मनाला शिवलेला नव्हता.. असा हा लाडू मिल्कशेकचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालतो आहे. लाडू खाण्याचा कंटाळा आला किंवा कधीकधी प्रमाण बिघडलेले लाडू जास्तच कडक झाले तर हा प्रयोग करून बघायला हरकत नाही..
लाडू मिल्क शेक करण्यासाठी या व्यक्तीने सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन प्रकारचे लाडू टाकले. यापैकी एक लाडू बेसन, मोतीचूर आणि बुंदीचा होता. त्यानंतर त्याने त्यात व्हॅनिला आईस्क्रिम आणि थोडे दूध टाकले. मिक्सर फिरवले आणि त्याचा शेक तयार करून तो एका ग्लासमध्ये भरला. त्यावरून थोडा लाडवाचा चुरा टाकला आणि खवय्यांना असा लाडू मिल्कशेकचा भरलेला ग्लास सर्व्ह केला. काही लोकांना हा प्रयोग अजिबातच आवडलेला नाही. लाडूचा शेक केला आता मॅगी, सामोसा, वडापाव यांचाही शेक करा.... अशी एका जणाने वाईट प्रतिक्रीया दिली असून त्यावर चिडलेले स्माईली टाकले आहेत.