मस्त गरमागरम वाफाळती मॅगी म्हणजे आहाहा... पावसाळ्यात तर मॅगी (maggi lover) खाण्याची मजा कित्येक पटींनी वाढलेली असते. पाऊस पडू लागला की खवय्यांना जसे चहाचे, गरमागरम भजी खाण्याचे वेध लागतात, तसंच मस्त वाफाळत्या चमचमीत मॅगीचीही खावरी सुटते. पाऊस असो किंवा थंडी असो, सकाळचा नाश्ता असो किंवा मग रात्रीच्या जागरणात काहीतरी चटपटीत खायला असो. मॅगी प्रत्येकवेळी साथ देतेच. त्यामुळेच तर कित्येकांना जान से भी प्यारी है मॅगी..
पण या मॅगीसोबत मात्र अनेक जण वेगवेगळे प्रयोग (Weird Food Combination with maggi) करत असतात. कधी मॅगीचं आईस्क्रिम करतात तर कधी मॅगीचा डोसा. मॅगीचा सामोसा आणि मॅगीचा पराठाही अनेक जणांनी केला आहे. ते एकवेळ समजू शकतं. पण आता मात्र तुम्ही डोक्यालाच हात माराल, असा मॅगीपासून तयार केलेला एक पदार्थ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आणि हा पदार्थ आहे मॅगी शेक. एवढ्या लाजवाब चवीच्या मॅगीला थंडगार दुधात टाकून कुणी तिचा शेक बनवत असेल, तर आता काय म्हणावं या प्रयोगाला आणि हा प्रयोग करणाऱ्या त्या अजब- गजब शेफला?
Video Nation या फेसबूक चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसंच युट्यूबच्या काही चॅनलवरही मॅगी मिल्क शेक कसा तयार करायचा, याविषयीचे काही व्हिडिओ आहेत.. काही जणांना हा प्रयोग आवडला आहे तर काही जणांनी ''किती जीव घेणार आता त्या मॅगीचा?'' अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्थात आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. त्यामुळे कुणी या प्रयोगावर नाराज आहे, तर कुणी नवं काही तरी चाखायला मिळतंय म्हणून खुश आहे. तुम्हाला जर मॅगी मिल्कशेक हा प्रयोग आवडला असेल किंवा खाऊन बघण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी Spicy Taste या युट्यूब चॅनलवर दिलेली ही रेसिपी करून बघू शकता.
मॅगी मिल्कशेक करण्यासाठी....
साहित्य
मॅगी, तूप, मैदा, दूध, चिलीफ्लेक्स, ओरिगॅनो, थोडीशी साखर.
कसा करायचा मॅगी मिल्कशेक?
- यासाठी सगळ्यात आधी मॅगी नेहमीप्रमाणे मसाला टाकून शिजवून घ्या.
- आता एका पॅनमध्ये तूप टाका. त्यात एक टेबलस्पून मैदा टाकून परतून घ्या.
- मैदा परतून झाला की त्यात दूध टाका.
- दुधामध्ये चिलीफ्लेक्स, ओरिगॅनो आणि थोडीशी साखर टाका. मैदा असल्याने दूध लवकर आटेल.
- आता एका ग्लासमध्ये थोडी शिजवलेली मॅगी टाका, त्यावर आपण तयार केलेले दूध टाका, पुन्हा थोडी मॅगी आणि थोडं दूध टाका आणि हा तयार झाला तुमचा मॅगी मिल्क शेक.. रेसिपी आवडली असेल तर करून बघा.