मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हणून एक तरी मुलगा हवाच असे म्हणणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. मुलगा झाला की त्याच्या जन्माचे स्वागत करणारे अनेक जण आपण पाहतो. बऱ्याच समाजांमध्ये आजही मुलगा होत नाही म्हणून महिलेला दोषी धरणे, मुलगा होत नाही तोपर्यंत मुलं होऊ देणे अशा घटना अगदी सर्रास घडतात. मुलीचा गर्भ असल्याने गर्भपात करण्याच्या घटना आताआतापर्यंत ताज्या होत्या. असे असले तरी आजही मुलगी झाली म्हणून सेलिब्रेशन करणारे आणि तिच्या जन्माचे स्वागत करणारेही बरेच जण असतात. मुलगी म्हणजे लक्ष्मी त्यामुळे मुलगी झाली म्हणून आनंदाने पेढे-बर्फी वाटणे, तिला घरी आणताना घराची सजावट करणे इथपर्यंत ठिक आहे. पण मुलगी झाली म्हणून एका कुटुंबाने चक्क मिरवणूक काढत तिचे जंगी स्वागत केले. नवजात मुलीला घरी नेतानाच्या मिरवणूकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून डोलीतून या दोघींना आणले जात असल्याचे यामध्ये दिसत आहे.
सोशल मीडीयावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही काहीसे आश्चर्य वाटू शकते. मुलीला घरी आणताना करण्यात आलेले ग्रँड सेलिब्रेशन यामध्ये दिसत आहे. त्यावरुन या कुटुंबाला मुलगी झाल्याचा किती आनंद झाला असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचे म्हटले जात आहे. उत्कर्ष सिंग या व्यक्तीने आपल्या अकाऊंटवरुन तो पोस्ट केला असून आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहीले आहे, मुलीचा जन्म झाला तर कुटुंबियांनी मुलगी आणि आईला डोलीमध्ये बसवून ढोल-नगारा वाजवत तिचा गृहप्रवेश केला.
हा व्हिडिओ ८१ हजारांहून अधिक जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ५ हजारहून अधिक नेटीझन्सनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. ५६ सेकंदांच्या या व्हि़डिओमध्ये एक डोली रस्त्याने जाताना दिसत आहे. ही डोली फुलांनी आणि लाल रंगाच्या कापडाने छानशी सजवली आहे. इतकेच नाही तर बाजूला ताशा वाजवण्याचा आवाजही येत आहे. भर पावसातही डोलीसोबत काही महिला, लहान मुले आणि पुरुष जाताना दिसत आहेत. एकूणच मुलगी झाल्यामुळे या कुटुंबाला किती कौतुक वाटले आहे हे आपण समजू शकतो.