भारतीय खाद्य संस्कृती विशाल आहे. भारतात खाद्य संस्कृती दर 20 कि.मीवर बदलते असं म्हणतात. भारतातल्या व्यक्तीनं संपूर्ण भारतीय खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायला म्हटलं तर एक जन्म अपुरा पडेल एवढी खाद्य पदार्थांची आणि चवींची विविधता आहे. भारतातली एका राज्यातली लोकं दुसऱ्या राज्यात पर्यटक म्हणून फिरायला जातात तेव्हा आधी तिथल्या म्हणून विशेष असलेल्या खाद्य पदार्थांची चव घेतात. खाद्य पदार्थांवरुन संस्कृती जोखण्याची आपली भारतीय सवयही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
नाविन्यपूर्ण पदार्थांचा, वैविध्यपूर्ण चवींचा आस्वाद घेऊन भारतीय लोक परत परत आपल्या देशाच्या प्रेमात पडतात. तेच परदेशातले पाहुणे भारतात फिरण्यासाठी येतात तेव्हा आपल्याकडील पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात हे बघण्यातही एक वेगळीच मजा आहे. असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे
Image: Google
इनव्हिजिबल इंडिया या अकाउण्टवरुन डिजिटल क्रिएटर असलेल्या जेसिका यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जेसिका गेल्या 16 वर्षांपासून भारतात राहातात. जेसिका यांनी त्यांच्या 90 वर्षांच्या आजी-आजोंबाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जेसिकानं आपल्या आजी आजोबांसाठी भारतातील शेव चिवडा फरसाण, लाडू गुलाबजाम हा खाऊ नेला. या व्हिडीओत जेसिकाचे आजी आजोबा पहिल्यांदा भारतातील शेव चिवडा, फरसाण, बुंदीचा लाडू, गुलाबजाम टेस्ट करताना दिसतात. भारतातल्या चटपटीत नमकीनबद्दलची उत्सुकता आजोबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. फरसाणचा एक घास खाल्ल्यानंतर आजोबा सू.. सू.. करत खूप मसालेदार असल्याचं सांगतात आणि या चवीची तीव्रता सौम्य करण्यासाठी काॅफीचा एक घोट घेत असल्याचं दिसतात तर बुंदीच्या लाडूचा आस्वाद घेऊन झालेला गोड आनंद आजींच्या चेहऱ्यावरील स्मितातून सहज दिसून येतो.
'टू स्पाइसी टू स्वीट' अशा टोकाच्या प्रतिक्रिया असलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेण्ट करताना अनेकांनी आजी आजोबांना भारतातील आणखी कोणकोणते पदार्थ अवश्य खायला द्यायला हवेत हे सूचवलं आहे. व्हिडीओतील आजी आजोबांची चिवडा लाडू खाल्या नंतरची प्रतिक्रिया अनेकांना एवढी आवडली की त्यांनी आजी आजोबांना एकदा भारतात नक्की आणण्याचा आग्रह केला आहे. तर कोणी आजी आजोबांना भारतातला गाजराचा हलवा खाऊ घाला, तर कोणी पोहे समोसा अवश्य टेस्टला द्या, तर कोणी आजी आजोबांनी भारतातला ढोकळा, दाल बाटी , सरसों का साग, मक्के दी रोटी हे पारंपरिक पदार्थ अवश्य खाऊन बघायला हवेत अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओतील आजी आजोबांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्ही आजी आजोबांना टेस्ट करण्यासाठी कोणता भारतीय पदार्थ सूचवाल?