प्रेशर कुकर ही आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. वरण भात शिजवायचा असो नाहीतर भाज्या, कडधान्य, पुरण या सगळ्यासाठीच आपण अतिशय नियमितपणे या कुकरचा वापर करतो. इतकेच नाही तर पुलाव, खिचडी किंवा काही पदार्थ शिजवण्यासाठीही अनेकदा आपण लहान आकाराच्या कुकरमध्ये ते शिजवतो. बरेचदा आपण एकदा कुकर खरेदी केला की तो चांगला असल्याने अनेक वर्ष वापरत राहतो. काही जण तर आजीच किंवा आईचा कुकर खूप चांगला आहे, झटपट काम होते म्हणून वर्षानुवर्षे हा कुकर वापरत राहतात. कुकरमध्ये अॅल्युमिनिअम, स्टील आणि काळ्या रंगाच्या मेटलचा असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. यातही आतल्या झाकणाचा, बाहेरच्या झाकणाचा, शिट्ट्या न होणारा असेही कुकरचे नवीन प्रकार आता बाजारात आले आहेत (What is the Ideal life of a pressure cooker).
बहुतांश कंपन्या कमीत कमी वेळात काम होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करु या कुकरची निर्मिती करतात. पण एकदा खरेदी केलेला कुकर किती वर्षे वापरायचा यावर आपण फारसा विचार करत नाही. मात्र कुकर वापरण्याचे काही एक लिमिट असते आणि ते लक्षात घेऊनच आपण या कुकरचा वापर करायला हवा. अन्यथा त्यातून अपघात होण्याची किंवा आरोग्याला हानी होण्याची शक्यता असते. कधी याचे गॅस्केट खराब होते तर कधी वॉल्व खराब होतो. काहीवेळा झाकणाचे खिळे लूज झाल्याने झाकण नीट लागत नाही. तर बरीच वर्षे कुकर वापरल्यानंतर त्याचा खालचा भागही पातळ होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टींमुळेच एकदा खरेदी केलेला कुकर साधारण किती वर्षे वापरलेला चांगला ते समजून घेऊया...
प्रेशर कुकर किती वर्षे वापरावा?
आपला कुकर वापरण्याची पद्धत कशी आहे आणि कुकरचा ब्रँड कोणता आहे यावर या कुकरच्या वापराची वर्षे ठरतात. जर आपण नियमित कुकर वापरत असू आणि त्याची दुरुस्तीही नियमितपणे करुन घेत असू तर हा कुकर साधारणपणे ५ वर्षे तरी टिकायला हवा. मात्र साधारणपणे एक कुकर ३ वर्षांपर्यंत चांगल्या पद्धतीने चालतात. प्रेशर कुकर जितका जास्त वेळ वापरला जाईल तितके त्याचे आयुष्य कमी होत जाते. हा कुकर जास्तीत जास्त दररोज १ तास वापरल्यास ठिक आहे मात्र त्याहून जास्त वापरु नये असे एका संशोधनातून समोर आले आहे. तसेच कुकर चांगला असेल तर तो जास्तीत जास्त ८ वर्षे वापरावा, त्याहून जास्त वापरु नये. याबरोबरच कुकरची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करुन घेणेही तितकेच जास्त गरजेचे आहे हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे.