फॅशन शो म्हटला की तिथे काही तरी वेगळं, नविन बघायला मिळणार हे नक्की असतं.. कारण वेगळे आणि हटके कलेक्शन लोकांसमोर येण्यासाठीच तर फॅशन शो आयोजित केले जातात. त्यामुळे तिथे येणाऱ्या मॉडेल आणि डिझायनर यांचा हाच प्रयत्न असतो की आपलं कलेक्शन सगळ्यात उठून दिसावं. असाच एक प्रयोग केला आहे लंडनमधल्या एका मॉडेलने...(Ramp walk of a model wearing dustbin garbage bag)
त्याचं झालं असं की लंडनमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस London Fashion Week आयोजित केला जातो. काहीतरी वेगळे आणि विचित्र कपडे घालणे ही या फॅशन शो ची खासियत आहे. त्यामुळेच तर Ellie Marie या मॉडेलने असा हा अफलातून प्रयोग केला आणि या फॅशन विकमध्ये तिची जबरदस्त चर्चा झाली. तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिने केलेला हा प्रयोग अतिशय कलात्मक असल्याची प्रतिक्रिया तिला अनेकांनी दिली... एली एक यु- ट्युबर असून ती नेहमीच असे वेगवेगळे प्रयोग करत असते. तिच्या यु ट्यूब व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळते. एवढेच नाही तर तिचे फॉलोअर्सही लाखोंच्या घरात आहेत..
तर या फॅशन शो मध्ये एलीने जे कपडे घातले होते ते तिने काळ्या रंगाच्या कचऱ्याच्या पिशव्यांपासून (garbage bag) बनविले होते. मेगा स्लिव्ह्ज असणारा तो एक मिनी फ्रॉक होता. विशेष म्हणजे या ड्रेसवर गळ्यातलं, हातातला बॅण्ड आणि हेअर बो म्हणूनही तिने प्लॅस्टिक पिशवीचाच वापर केला होता. ड्रेसवर असलेल्या बेल्टमध्ये डाव्या हाताला तिने एक कोल्ड्रिंकची तुटलेली बॉटल अडकवली होती. गळ्यात एक पर्स आणि गम शुज असा सगळा तिचा पेहराव होता. कार्यक्रमस्थळी जाताच अनेक कॅमेरे एलीकडे सरसावले आणि बघता बघता तिची ही वेशभुषा लोकांना भलतीच आवडून गेली.