Join us  

पावसाळ्यात महागाच्या फर्निचरवर पांढरी बुरशी? टेन्शन घेऊ नका करा फक्त 4  सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 6:51 PM

व्हिनेगर, ब्लीच, डिश वाॅशिंग पावडर आणि हायड्रोजन पेराॅक्साइडचा वापर करुन फर्निचरची बुरशी (how to clean fungus on furniture) काही मिनिटात स्वच्छ करता येते. 

ठळक मुद्देघरातल्या इतर स्वच्छतेच्या कामासाठी वापरलं जाणारं व्हिनेगर फर्निचरची बुरशी घालवण्यासाठीही वापरता येतं. भांडे घासण्याच्या लिक्विड डिटर्जंटनेही फर्निचरची बुरशी घालवता येते. हायड्रोजन पेराॅक्साइडमध्ये बुरशीनाशक गुणधर्म असल्याने फर्निचरची बुरशी घालवण्यासाठीही याचा वापर करता येतो.

पावसाळ्यात घरातल्या प्रत्येक गोष्टीची बारकाईनं काळजी घ्यावी लागते. त्यात खिडक्यांशेजारीच जर फर्निचर असेल तर, भिंतींना खेटून फर्निचर असेल आणि भिंतीना ओल येत असेल तर महागड्या फर्निचरलाही पांढरी बुरशी (white fungus on furniture)  लागते. फर्निचरवरची बुरशी पाहिली की टेन्शन येतं.. पण टेन्शन न घेता अगदी सोपे उपाय (easy tips to remove white fungus on furniture)  करुनही ही पांढरी बुरशी घालवता येते. 

Image: Google

फर्निचरवाची बुरशी साफ करताना...

फर्निचरवरची बुरशी साफ करण्यासाठी हातात ग्लव्ह्ज घालावेत आणि तोंडाला मास्क लावावं. म्हणजे बुरशीचा शरीरावर वाईट परिणाम होणार नाही. सर्वात आधी हलक्या हातानं फर्निचरला लागलेली बुरशी झटकून टाकावी. यासाठी मऊ ब्रशचा वापर केला तरी चालतो.   व्हिनेगर, ब्लीच, डिश वाॅशिंग पावडर आणि हायड्रोजन पेराॅक्साइडचा वापर करुन फर्निचरची बुरशी काही मिनिटात स्वच्छ करता येते. 

1. घरातील इतर स्वच्छतेसाठीही व्हिनेगरचा वापर केला जातो. फर्निचरला लागलेली बुरशीही व्हिनेगरने साफ करता येते. यासाठी 1 कप व्हाइट व्हिनेगर, पाणी आणि 1 सूती कपडा घ्यावा.  एखाद्या भांड्यात किंवा बादलीत पाणी आणि व्हिनेगर एकत्र करुन घ्यावं. या पाण्यत सूती कपडा भिजवून पिळून घ्यावा. या कापडानं बुरशी लागलेल्या जागी पुसावं. 3 ते 4 वेळा या पाण्यानं बुरशीची जागा पुसल्यास फर्निचर स्वच्छ होतं. 

2. ब्लीचचा वापर करुनही फर्निचर स्वच्छ करता येतं. यासाठी 1 कप ब्लीच आणि एक मोठं भांडं पाणी घ्यावं.  पाण्यात ब्लीच घालून ते चांगलं एकत्र करुन घ्यावं. हे मिश्रण स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. बुरशी असलेल्या जागी ते फवारावं. थोडा वेळ ते तसंच राहू द्यावं. नंतर ओलसर फडक्यानं फर्निचर पुसून घ्यावं. 

Image: Google

3.  भांडे घासण्याच्या लिक्विड डिटर्जंटनेही फर्निचर स्वच्छ करता येतं. त्यासाठी गरम पाण्यात लिक्विड डिटर्जंट घालावं. या  पाण्यात फडकं बुडवून पिळून घ्यावं आणि त्या फडक्यानं फर्निचरची बुरशी पुसल्यास फर्निचर स्वच्छ होतं. 

4. घरातल्या स्वच्छतेसाठी,कपड्यांवरचे डाग घालवण्यासाठी हायड्रोजन पेराॅक्साइडचा वापर केला जातो. हायड्रोजन पेराॅक्साइडमध्ये बुरशीनाशक गुणधर्म असल्याने फर्निचरची बुरशी घालवण्यासाठीही याचा वापर करता येतो. हायड्रोजन पेराॅक्साइड फर्निचरवर बुरशी असलेल्या जागेवर लावल्यास बुरशी निघून जाते. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्स