बहीण - भावाचे नाते किती अतूट असते हे आपण सगळ्यांनीच अनुभवले असेल. बहीण - भाऊ कधी एकमेकांवर रागावतात, कधी भांडतात, कधी रुसवे - फुगवे धरून बसतात. भावनांच्या अनेक छटा दाखविणारे हे नाते खूप सुंदर असते. बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. रक्षाबंधन येताच राखी बांधायला येणारा भाऊ, दिवाळी आली की बहिणीला माहेरी घेऊन जाणारा भाऊ, बहीण सासरी जाताना गपचूप एका कोपऱ्यात रडत उभा असणारा भाऊ, बहिणीची आठवण येते म्हणून फोन लावून तासंतास गप्पा मारणारा भाऊ, बहिणीच्या प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ अशी भावाची अनेक रूपे आपण आजवर पहिली असतील. सध्या सगळीकडे ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक लहान मुलं आपल्या इच्छेप्रमाणे सांताक्लॉजकडे काही ना काही मागत आहे. सांताक्लॉज येऊन आपली इच्छा पूर्ण करेल अशी वाट पाहत आहेत. परंतु या चिमुकल्या बहिणीसाठी तिचा भाऊच सांताक्लॉज बनून तिची इच्छा पूर्ण करत आहे (When Brother Became Santa Claus For Sister).
काय आहे या व्हिडिओत ?GoodNewsCorrespondent या ट्विटर हॅण्डल वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात दोन चिमुकले बहीण - भाऊ दिसत आहेत. यातील छोट्या बहिणीला सांताक्लॉजने येऊन आपल्याला खेळण्यातील एक टॉय हाऊस म्हणजेच छोट घर गिफ्ट करावं अशी इच्छा व्यक्त करते. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सांताक्लॉज नाही तर चक्क तिचा मोठा भाऊच धावून आला आहे. आपल्या लाडक्या बहिणीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या पट्ठ्याने तिच्यासाठी एक छोटेखानी घर बांधलं. एवढंच करून हा भाऊ थांबला नाही तर त्याने जुन्या पुठ्ठयांचा वापर करून घरातील वस्तू जसे की, फ्रिज व वॉर्डरोब देखील तयार केले. जुने पुट्ठे, कागद, पडदे यांचा वापर करून त्याने बहिणीसाठी खेळण्यातील घर बनवून दिले. हे घर बनवून झाल्यावर तो तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला सरप्राईज देण्यासाठी घेऊन येताना दिसत आहे. ती चिमुकलीसुद्धा हे घर बघून खूप आनंदीत होते. आपल्या लाडक्या भावाने दिलेले हे सरप्राईज बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जर प्रत्येक बहिणीला असा लाड पूर्ण करणारा भाऊ मिळाला तर तिला सांताक्लॉजने येऊन गिफ्ट देण्याची वाटच बघावी लागणार नाही.
नेटिझन्स काय म्हणत आहेत ?
नेटिझन्सनी या व्हिडीओला भरपूर पसंती दर्शविली आहे. या व्हिडिओला जवळपास ४७,००० च्या पुढे व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी भावा - बहिणीचं प्रेम बघून अत्यंत भावुक होऊन कमेंट्स केल्या आहेत. या छोट्याश्या व्हिडिओत किती प्रेम दिसत आहे, अशी प्रतिक्रिया करण्यात आली आहे. हा व्हिडीओ बघताना अश्रू अनावर झाले, कधी - कधी आपण विसरतो की आपल्याजवळ किती आहे. अशी भावनिक कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.