मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ चा किताब मिळवलेली झोया अफरोज आणि मिस मल्टीनॅशनल इंडिया दिविजा गंभीर या दोघींनी नुकतीच ताजमहालला भेट दिली. या दोन सुंदऱ्या जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालमध्ये बराच वेळ फिरल्या. इतकेच नाही तर त्यांनी याठिकाणी मनसोक्त फोटोशूट केले. झोया ही मुंबईची असून ती अवघ्या २६ वर्षांची आहे. आता ती मिस इंटरनॅशनल २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. झोयाच्या फोटोंना सोशल मीडियावर नेटीझन्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. हम साथ साथ है या चित्रपटात सलमान खानला मामा म्हणणारी राधिका म्हणजेच झोया असल्याचे अनेकांच्या लक्षातही येणार नाही. याआधीही तिने अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये नाव कमावले आहेत. तर मिस इंडिया मल्टीनॅशनल दिविजा ही मुंबईची असून तिनेही आतापर्यंत अनेक किताब पटकावले आहेत.
प्रेमाचे प्रतिक असणारा ताजमहाल आणि या दोन सुंदऱ्यांचे फोटो लक्ष वेधून घेणारे ठरले. विशेष म्हणजे या दोघींनी आपल्या या भेटीत एका गाईडकडून ताजमहालविषयीचा इतिहास, वास्तूकला, उद्यान, राजा शाहजान व मुमताजविषयी माहिती घेतली. मिस इंडियाचा सोहळा ऑगस्ट महिन्यात गुरगावमध्ये झाला होता, त्यावेळी त्यांच्या डोक्यावर हा मानाचा मुकुट घालण्यात आला. दिविजा गंभीर हिने पहिल्यांदाच ताजमहाल पाहिला तर जोया हिने तिसऱ्यांदा ताजमहालला भेट दिली. यावेळी त्या दोघींनी अतिशय सुंदर ड्रेस परिधान केले होते. तर त्यांच्या डोक्यावरील मिस इंडियाच्या खड्यांच्या मुकुटाने सौंदर्यात आणखी भर पडली. व्हिजिटर्स बुकमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवत पुन्हा ताजमहालला येण्याची इच्छाही त्यांनी प्रकट केली. यावेळी उपस्थित पर्यटकांनीही आपल्या कॅमेरात त्यांचे फोटो कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.