सध्या महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहे. कामानिमित्त अनेक महिलांना रोज घराबाहेर पडावं लागतं, काहींना चूल आणि मूल सांभाळत कामातील जबाबदारी सांभाळावी लागते. त्यात जर रात्री उशिराची शिफ्ट असली तर सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. यामुळे कित्येक महिलांना कामासाठी कुटुंबाकडुन विरोधही केला जातो. त्यामुळे कित्येक महिलांची जॉब करण्याची स्वप्ने तशीच अर्धवट राहतात.
मुंबईत मात्र अनेकजणींना याबाबत फारशी चिंता करावी लागत नाही, कारण ट्रेनमध्ये त्यांच्या सुरक्षेची काळजी वर्दितला व्यक्ती घेत असतो. रात्रीच्या अगदी शेवटच्या ट्रेनमध्ये सुद्धा महिलांच्या प्रत्येक डब्ब्यात त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी असतात. याबद्दल रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला काय वाटते, तिच्या भावना व्यक्त करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत मुबंईच्या लोकलमध्ये एक पोलीस कर्मचारी उभा असलेला दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘जेव्हा ती एकटी रात्रीच्या वेळी प्रवास करते’ असे लिहले आहे. पोलीस कर्मचारी सदैव त्यांचे कर्तव्य निभावत असल्यामुळे या महिलांना कोणतीही चिंता सतावत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांमुळे आपण सुरक्षित प्रवास करू शकतो, असे या महिलेचं मत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आहे.
रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकीच्या मनात या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सुरक्षेची भावना येते, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.