अभिनेत्री दिपिका पदुकोण बरेच दिवसांपासून फारशी नजरेला पडली नाही. सध्या दिपिका गायब आहे, कारण...ती इकडे तिकडे कुठेही गेलेली नसून ती तिच्या व्हर्च्युअल स्पेसमध्ये बिझी आहे. आता हे काय प्रकरण असतं बुवा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दिपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला हा व्हिडियो नक्की पाहा. ती गेल्या काही दिवसांपासून मेटाव्हर्समध्ये आहे. म्हणजे काय तर दिपिकाने एक भन्नाट व्हिडियो शेअर केला आहे. त्यामध्ये एका छानशा मोकळ्या रोडवरुन ती कार चालवत चालली आहे. अचानक तिचे एका बोर्डकडे लक्ष जाते आणि त्यावर लिहीलेले असते ‘एन्टरींग मेटाव्हर्स’. हे पाहिल्यावर दिपिका आपल्या गाडीच्या काचा बंद करते आणि त्यानंतर ती एका आभासी जगात प्रवेश करते. काही क्षणातच दिपिकाची कार एका अंतराळात जाते. कसलं भारी ना... असं रोडवरुन जात असताना अचानक अंतराळात जाता आलं तर?
आपल्याला व्हिडियोमध्ये दिसणारे हे दृश्य तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. दिपिका सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळते. सतत काही ना काही पोस्ट करत ती आपल्या चाहत्यांना खूश करत असते. नुकत्याच तिने पोस्ट केलेल्या या व्हिडियोला काही दिवसांत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हजारांहून जास्त जणांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. आपल्या या पोस्टला ती ‘इनटू द मेटाव्हर्स’ अशी कॅप्शन देते. अतिशय सुंदर अशा रोडवरुन लाल रंगाची कार चालवणारी दिपिका आपल्याला एकदम डॅशिंग वाटते. मेटाव्हर्सचा बोर्ड वाचल्यानंतर घाबरल्याचा तिने केलेला अभिनयही आपल्याला एकदम खरा वाटतो. तंत्रज्ञानाच्या कमालीमुळे अशाप्रकारचे प्रयोग आता सहज शक्य झाले आहेत.
मेटाव्हर्स म्हणजे काय?
3D इफेक्ट देऊन वास्तव घटना आणि आभासी घटना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र केल्या जातात. सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून हे करता येते. या माध्यमातून तुम्ही लोकांशी व्हर्च्युअली संवाद साधू शकता. या आभासी जगात युजर्स डिजिटल विश्वात जगत असतात. या विश्वातून ते जगाची सफरही करुन येतात.
नुकतीच दिपिकाच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त तिचा नवरा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि ती उत्तराखंड याठिकाणी फिरायला गेले होते. त्याचे बरेच फोटोही दिपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. तर तिचा ‘83’ हा सिनेमाही २४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तो हिंदीसह तमिळ, तेलगू, कानडी आणि मल्ल्याळम अशा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.